महान फिरकीवीर बिशनसिंग बेदी यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचे माजी फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदी यांचे सोमवारी निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. बिशनसिंग बेदी यांनी 1967 ते 1979 या काळात 67 कसोटी सामन्यांमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले. आपल्या 13 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांनी 266 बळी टिपले. याचबरोबर त्या वेळी नुकत्याच सुरू झालेल्या एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्यांनी 7 फलंदाज बाद केले. 70च्या दशकातील हिंदुस्थानी फिरकी आक्रमणाचा कणा असलेले डावखुरे बेदी हे फलंदाजांसाठी कर्दनकाळ होते.

पहिल्या वन डे विजयाचे शिल्पकार

बिशनसिंग बेदी यांना हिंदुस्थानी फिरकीचा पाया रचण्यासाठी ओळखले जाते. त्यांच्या जोडीने इरापल्ली प्रसन्ना, बी.एस. चंद्रशेखर आणि एस. व्यंकटराघवन यांनी एक काळ गाजवला. या फिरकीपटूंनी हिंदुस्थानच्या पहिल्या वन डे विजयात महत्त्वाची भूमिका बजाविली होती. 1975च्या वर्ल्ड कपमध्ये बेदींनी ईस्ट आफ्रिकेविरुद्ध भेदक मारा करीत त्यांना 120 धावांत रोखले होते. या सामन्यात बेदी यांनी 12 षटकांतील तब्बल आठ षटके निर्धाव टाकली होती. उरलेल्या चार षटकांत सहा धावांच्या मोबदल्यात त्यांनी एक गडी बाद केला होता.

निवृत्तीनंतरही बजावल्या विविध भूमिका

बिशनसिंग बेदी यांचा जन्म 25 सप्टेंबर 1946 रोजी अमृतसरमध्ये झाला होता. तेव्हा त्यांच्या फिरकी गोलंदाजीच्या विशिष्ट शैलीमुळे ते चर्चेत आले होते. 20व्या वर्षी, अर्थात 1966 साली त्यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. दरम्यान, बिशनसिंग बेदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने इंग्लंडविरुद्ध साकारलेला ऐतिहासिक मालिकाविजय त्यांच्या कारकिर्दीतील मानाचा तुरा ठरला. देशाअंतर्गत क्रिकेटमध्ये बेदी हे मुख्यत्वे दिल्लीच्या संघाकडून खेळले. निवृत्तीनंतर त्यांनी प्रशिक्षक आणि मेंटॉरची भूमिकादेखील बजावली.