
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. पवार ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल झाले आहेत.
माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 26, 2020
ट्विट करून दिली माहिती
उपमुख्यमंत्री पवार यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी लक्षणे जाणवल्याने पवार क्वारंटाईन झाले होते. आज त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सावधगिरी म्हणून पवार ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल झाले आहेत. कोणीही काळजी करू नये आपण लवकरच बरे होऊ असेही पवार म्हणाले आहेत.
राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचं काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत पुन्हा कार्यरत होईन.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 26, 2020
माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनाही कोरोनाची लागण
काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही कोरोनाची लागण झाली होती. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात अनेक दौरे केले. त्याचसोबत बिहार विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने त्यांची बिहारचे प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. त्यामुळे त्यांनी बिहारचा दौरा केला होता. नुकताच देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाचाही दौरा केला होता.
दौऱयांच्या काळात लोकांमध्ये मिसळताना त्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती होती. त्यामुळे मला कोरोनाची लागण झाली तर मला खासगी रुग्णालयात दाखल करू नका. मला उपचारांसाठी सरकारी रुग्णालयात दाखल करा, असे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे मित्र व माजी मंत्री गिरीश महाजन यांना मध्यंतरी सांगितले होते. त्यांच्या चाचणीत कोरोनाचे निदान झाल्यावर पुढील उपचारांसाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल झाले आहेत.

























































