
कोपरगाव येथे गेल्या दहा दिवसांपासून तालुक्यातील देर्डे कोऱ्हाळे परिसरात शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरीला जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला असून पोलिसांनी चोरट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे .
सतीश रावसाहेब दिघे यांच्या विहिरीवर असलेल्या दोन 3 एचपीच्या विद्युत मोटारी गेल्या दहा दिवसांच्या फरकाने चोरीला गेल्या. त्यांनी रीतसर कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनला याबाबत फिर्याद दिली आहे. 18 जानेवारी रोजी रात्री आपल्या शेतात लावलेल्या कांदा पिकांना पाणी देण्यासाठी दिघे विहिरीवर गेले असता त्यांनी विद्युत मोटारीचे स्टँटर चालू केले असता विद्युत मोटार चालू न झाल्याने त्यांना शंका आली आणि त्यांनी पाईप वर उचलला असता त्यांना मोटर चोरी गेले असल्याचे लक्षात आले. आजूबाजूच्या शेतात त्यांनी मोटार दिसते का म्हणून बघितले असता त्यांना मोटर आढळून आली नाही. मोटार चोरी गेली असल्याची खात्री पटताच त्यांनी याबाबत गावातील शेतकऱ्यांना माहिती दिली. सलग दहा दिवसांत दोनदा विद्युत मोटर चोरीला गेल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे.
गेल्या तीन महिन्यांपूर्वी देर्डे कोराळे व हिंगणी ग्रामस्थांनी विद्युत मोटारी चोरणाऱ्या चोरांना रंगेहात पकडले होते. सध्या शेतकऱ्यांनी शेतात रब्बीचे गहू, कांदा, मका, अदी पिके शेतात घेतली आहे. मात्र गेल्या काही दिवसात अनेक शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरीला गेल्याने शेतीतील पिकांना पाणी द्यायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

























































