
माघी शुद्ध जया एकादशीनिमित्त मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा पार पडली. विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी, तर रुक्मिणी मातेची पूजा प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते सपत्नीक झाली. माघी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी सुमारे तीन लाख भाविक दाखल झाले आहेत.
माघी एकादशीनिमित्त मंदिरात विविध फुलांची आरास करण्यात आली आहे. यामध्ये झेंडू, शेवंती, जरबेरा अशा विविध जातींच्या एकूण 1 टन फुलांची आरास करण्यात आली आहे. यावेळी मंदिर समितीच्या दिनदर्शिकेचे व डायरीचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, प्रकाश महाराज जवंजाळ, मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.
माघी एकादशीला राज्यातील इतर जिह्यांतून तसेच परराज्यांतून सुमारे तीन लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने व मंदिर समितीच्या वतीने वारकरी व भाविकांसाठी आवश्यक उपाययोजना तसेच सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पोलीस प्रशासनाच्या वतीने भाविकांच्या सुरक्षिततेसह कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
‘वन’मुळे भाविकांची वर्दळ झाली सुखकर
श्री विठ्ठल मंदिराच्या नामदेव महाद्वारासमोर होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी ‘वन’ वाहतूक सुरू केल्याने भाविकांचा श्वास मोकळा झाला असून, चेंगराचेंगरीतून सुटका झाल्याने भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे.



























































