जेईई मुख्य परीक्षेत  पुण्याचा ज्ञानेश शिंदे राज्यात पहिला

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने जेईई मेनच्या पहिल्या सत्राचा निकाल जाहीर केला आहे. देशातील 20 विद्यार्थ्यांना या परीक्षेत 100 पर्सेंटाईल मिळाले आहेत. मूळचा पुणे येथील ज्ञानेश शिंदे हादेखील 100 पर्सेंटाईलसह देशातील टॉप 20 विद्यार्थ्यांमध्ये झळकला असून राज्यातून प्रथम येण्याचा मानही त्याने पटकावला आहे. यंदा 100 पर्सेंटाईल मिळविलेल्या विद्यार्थ्यांमध्ये एकाही मुलीचा समावेश नाही. देशातील दोन विद्यार्थिनींना या परीक्षेत 99.99 पर्सेंटाईल मिळाले आहेत.

यंदा जेईई मेन परीक्षेसाठी सर्वाधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या 8.60 लाख विद्यार्थ्यांपैकी 8 लाख 23 हजार 967 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यांपैकी 2 लाख 43 हजार 928 मुली,  5 लाख 80 हजार 37 मुले होती, तर 2 ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश होता. 100 पर्सेंटाईल मिळालेल्या 20 विद्यार्थ्यांमध्ये 14 जण सर्वसाधारण गटातील, 4 ओबीसी-एनसीए आणि प्रत्येकी 1 सर्वसाधारण ईडब्ल्यूएस आणि एससी प्रवर्गातील आहे. मुलींमध्ये मीसला प्राणथी श्रीजा हिने 99.997 पर्सेंटाईलसह देशात मुलींमध्ये पहिले स्थान पटकावले आहे, तर रामिरेड्डी मेघना 99.994 पर्सेंटाईलसह दुसऱया क्रमांकावर आहे.

यंदा एकूण 8.6 लाख उमेदवारांनी पेपर 1 तर 0.46 लाख उमेदवारांनी पेपर 2 साठी नोंदणी केली आहे. यंदा जेईई मेनच्या पहिल्या सत्रासाठी एकूण उपस्थिती 95.79 टक्के होती. परीक्षा एजन्सीने जेईई प्रवेश परीक्षा सुरू केल्यापासूनची सर्वाधिक उपस्थिती यंदाच्या परीक्षेला होती. यंदा महाराष्ट्रातून परीक्षेला बसणाऱया विद्यार्थ्यांची संख्याही सर्वाधिक होती. 1 लाख 6 हजार महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी जेईई मेनसाठी नोंदणी केली होती. यात 72 हजार 12 मुले तर 34 हजार 93 मुली होत्या.

जेईईच्या दुसऱया सत्रासाठी नोंदणी सुरू

जेईई मेनचे दुसरे सत्र 6,8,10 ते 12 एप्रिलदम्यान होणार आहे. या दुसऱया सत्रासाठी नोंदणी सुरू झाली असून विद्यार्थ्यांना 7 मार्चपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

आयआयटी मुंबई सीएस शाखेतून बी.टेक करायचेय

मूळचा पुण्याचा असणाऱया ज्ञानेश शिंदेला आयआयटी मुंबई सीएस शाखेतून बी.टेक करायचे आहे. शिक्षणासाठी ज्ञानेश त्याच्या आईसोबत सध्या कोटा येथे वास्तव्यास असून त्याचे वडील हेमेंद्र शिंदे नोकरीनिमित्त इतर ठिकाणी राहत आहेत, तर बहीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंग्रपूर येथून एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. ज्ञानेश आपल्या अभ्यासाविषयी खूपच आशावादी असून तो सध्या जेईई अॅडव्हान्सच्या तयारीला लागला आहे.