
सूर्यप्रकाश आणि अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी सनग्लासेस वापरल्या जातात. तरुणांमध्ये सनग्लासेस वापरण्याची क्रेझ असते, मात्र काही जण गरज नसतानाही सनग्लासेस वापरतात, मात्र सनग्लासेस नियमित परिधान केल्याने शरीराच्या सर्केडियन लयीमध्ये अडथळा येऊ शकतो आणि विविध आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात याशिवाय हार्मोन्स असंतुलित होऊ शकतात, निद्रानाश आणि नैराश्यासारखे आजार होऊ शकतात. सनग्लासेस घालण्याबद्दल तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे.
टिम ग्रे, हेल्थ ऑप्टिमायझिंग बायोहॅकर, मानसशास्त्र विशेषज्ञ, उद्योजक आणि ग्लोबल स्पीकर यांच्या म्हणण्यानुसार, “दिवसभर किंवा नियमित सनग्लासेस लावल्याने शरीरातील पाइनल ग्रंथीवर वाईट परिणाम होतो. दिवसा सूर्यापासून एक विशिष्ट तरंगलांबी डोळ्यापर्यंत पोहोचते ज्यामुळे पिट्यूटरी आणि पाइनल ग्रंथीवर परिणाम होतो. यामुळे मेंदूला सिग्नल मिळतो की, बाहेर ढगाळ आहे. यामुळे त्वचा थेट सूर्यप्रकाशासाठी आणि जीवनसत्त्व डी तयार करण्यासाठी तयार होते. यामुळे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सनग्लासेसमुळे सर्केडियन लय बिघडू शकते. यामुळे तणाव, निद्रानाश आणि नैराश्यदेखील येऊ शकते.
सूर्यप्रकाशाच्या महत्त्वाविषयी तज्ज्ञ सांगतात, सूर्यप्रकाशामुळे मेंदूतील हायपोथालेमसला उत्तेजित करून तुमच्या संप्रेरकांचे नियमन करण्यास मदत होते. हे कार्य पायनल ग्रंथीशी जोडलेले आहे, मात्र जेव्हा तुमचे डोळे नैसर्गिकरित्या सूर्यप्रकाश बघू शकत नाहीत, तेव्हा संप्रेरकांचे चक्र बदलते. यामुळे तुमचा मूड बदलतो. यामुळे तुमचे डोळे थकतात कारण त्यांना नैसर्गिक प्रकाशासाठी खूप संघर्ष करावा लागतो. याचा काही वेळा दृष्टीवरही परिणाम होतो. स्कीइंग, पाण्यात किंवा ड्रायव्हिंग करताना, धूळ टाळण्यासाठी सनग्लासेस वापरण महत्त्वाचे असते; मात्र ही दिवसभर किंवा दररोज वापरण्याची वस्तू नाही.






























































