परीक्षण – समर्थ रामदासांचे व्यक्तिमत्त्व उलगडणारा ग्रंथ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>डॉ. अस्मिता देशमुख

लेखक सुरेश जाखडी लिखित ‘श्री समर्थ रामदास : एक अभ्यास’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. रामदास स्वामींचे चरित्र, त्यांचे वाङ्मयीन, सामाजिक आणि राजकारणसदृश कार्य आणि कर्तृत्व या 448 पानी ग्रंथात वाचायला मिळते.

सतराव्या शतकात महाराष्ट्राने जे क्रांतीकार्य पाहिले त्यात समर्थ रामदासांचा वाटा मोलाचा आहे. रामदास स्वामींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हिंदू संस्कृतीला, हिंदू धर्माला तत्कालीन म्लेंच्छांच्या विध्वंसक कारवायांपासून, आक्रमणापासून वाचवण्याचे महान कार्य केले आहे. समर्थांच्या या कार्याचे परिशीलन करताना लेखकाने तत्कालीन मेंच्छ राज्यकर्त्यांच्या हिंदू धर्मद्रोही, विध्वंसक कारवाया, अभ्यासकांचे संदर्भ देत या ग्रंथात मांडल्या आहेत. त्यात शंकरराव देवांनी उद्धृत केलेल्या काही परदेशी प्रवाशांनी या कालखंडात लिहून ठेवलेल्या आठवणींचा उल्लेख आहे. त्या प्रवाशांत इटलीचा मनूची, फ्रांसचे टाव्हरनिअर, बरनियर, जर्मनीचा मंडेल स्लो यांनी तत्कालीन राजकीय, सामाजिक परिस्थिती वर्णन केली आहे. म्लेंच्छ राजवटीच्या पाठिंब्यावर तत्कालीन सुफी संतांनी हिंदूंना बाटवण्याचा सपाटा लावला होता. त्यामुळे राजकीय आक्रमकतेबरोबर सांस्कृतिक आक्रमण पाय पसरीत होते. हे सांस्कृतिक आक्रमण छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी या दोघांनीही ओळखले होते. समर्थांनी हिंदू धर्म व संस्कृती रक्षणार्थ धार्मिक पातळीवर समान संघटन उभारून ठिकठिकाणी मठ स्थापना करायला व लोकांना राम व हनुमान यांची उपासना, त्याचा प्रचार-प्रसार करायला सुरुवात केली, तर इकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा गड जिंकून हिंदवी स्वराज्याची घोषणा करून महाराष्ट्रातील गड-किल्ले सर करायला सुरुवात केली. समर्थ रामदास व शिवछत्रपती यांच्ंया स्वराज्य धर्मरक्षणाचे विचार एक होते. आपल्या प्रतिभासामर्थ्याने दोघांनीही अलौकिक कार्य केले आहे.

रामदासस्वामी भक्तिमार्गी संत होते, पण हिंदुस्थानभर केलेल्या परिभ्रमण काळात जुलमी म्लेंच्छ राजवट आणि हिंदू समाजाचे, संस्कृतीचे हाल पाहून त्यांना वेगळे विचार सुचले. रामदासांनी ज्ञानाची, प्रपंच विज्ञानाची महती सांगायला, लोकांना जागृत करायला सुरुवात केली. पूर्वीच्या आचार्यांनी निवृत्तीवादाचे महत्त्व बिंबवले होते. त्याचा विपरीत अर्थ घेतल्याने संसारविमुखतेचा प्रचार, प्रसार केला गेला. त्यामुळे ऐहिक आशा-आकांक्षा नष्ट होऊन समाजात शैथिल्य आले. तशात म्लेंच्छांच्या विध्वंसक कारवाया, मंदिरे, त्यातील देवांच्या मूर्तींची तोडफोड, स्त्रियांची विटंबना याने लोक भयभीत झाले होते. हिंदू समाज, हिंदू संस्कृती टिकते की नाही अशी अवस्था. अशा कठीण प्रसंगी रामदासांनी लोकांना राम व हनुमान यांची उपासना, बलोपासना यांचे धडे देऊन लोकांना धीर दिला. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याला दासबोधादी ग्रंथ लिहून तात्त्विक अधिष्ठान मिळवून दिले.

समर्थांनी हिंदुस्थानभर 1100 मठ स्थापन केले. लेखकाच्या मते ती ज्ञानकेंद्रे होती, संस्कृती रक्षणाची केंद्रे होती. समर्थांच्या अंगच्या विविध गुणांची ओळख लेखकाने ऐतिहासिक घटनांच्या आधारावर करून दिली आहे. उपासना, प्रयत्न, प्रचीती, संघटनेचे महत्त्व, विवेकनिष्ठा, तर्कनिष्ठा, बलोपासना लोकांत मुरवणारा रामदासांसारखा दुसरा तत्त्ववेत्ता संत नाही, असा निष्कर्ष लेखकाने काढला आहे. तरीही समर्थ रामदास या ना त्या कारणाने दुर्लक्षित, उपेक्षित राहिले. म्हणून रामदासांच्या गुणांची ओळख पुढील पिढीपर्यंत न्यावी या उद्देशाने हे पुस्तक लिहिल्याचे जाखडी यांनी प्रास्ताविकात नमूद केले आहे. रामदासस्वामींवर आरोप-प्रत्यारोप होत राहिले, आजही होत आहेत. लेखकाने त्याचा चिकित्सक अभ्यास करून त्यांची पार्श्वभूमी तपासून त्या आरोपांना यथोचित उत्तरे प्रसंगानुरूप दिली आहेत. त्यात द्वेष, मत्सर, कालविपर्यास ही कारणे दिसतात. टीकाकारांच्या पूर्वग्रहदूषित विचारांमुळे रामदासांनी बालवयात स्वत:च्या विवाह-मंडपातून देव-देशकार्यासाठी केलेले पलायन हा चेष्टेचा विषय झाला. ‘टवाळा आवडे विनोद’ या त्यांच्या उक्तीवरून त्यांना विनोदाचे शत्रू ठरवण्यात आले.

दासबोधातील काही ओव्या विपर्यास्त स्वरूपात मांडून यातून टीकाकारांना हवे तसे अर्थ शोधण्याचा प्रयत्न झाला. पण साऱयांच्या मुळाशी कालविपर्याचा दोष असल्याचे मत लेखकाने मांडले आहे.

या पुस्तकाच्या सर्व प्रकरणांतील विवेचन अभ्यासपूर्ण व वाचकांना विचार करायला लावणारे आहे. ‘दासबोध विचार दर्शन’ या प्रकरणात दासबोध ग्रंथातील अध्यात्म्य विचार सोप्या भाषेत मांडल्याने वाचकांना दासबोध ग्रंथ मुळातून वाचण्याची प्रेरणा होईल. ब्रम्हनिरुपणासारखा गहन विषय लेखकाने सोपा करून सांगितला आहे. त्याचप्रमाणे स्फूट प्रकरणातील राजधर्म, क्षात्रधर्म, शिवाजी महाराजांस पत्र, संभाजीस पत्र, चाफळची सनद, तुळजाभवानीची स्तोत्रे, महाराष्ट्रधर्म, आनंदवन भुवनी इत्यादी प्रकरणातील विश्लेषणाने रामदास स्वामींचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व साकारले आहे.

‘श्री समर्थ रामदास : एक अभ्यास’ हे पुस्तकाचे नाव सर्वार्थाने योग्य असे झाले आहे. पुस्तकातील प्रत्येक भागात विविध ग्रंथांचे, ग्रंथकारांचे, विचारवंतांचे, अभ्यासकांचे संदर्भ देत लेखकाने आपले विचार मांडले आहेत. त्यातून लेखकाच्या व्यासंगी मांडणीची कल्पना येते. या थोर अभ्यासकांत ल. रा. पांगारकर, वि. का. राजवाडे, शंकरराव देव, श्री. म. माटे, प्रा. के. वि. बेलसरे, डा. पु. ग. सहस्रबुद्धे, रा. द. रानडे यांचा समावेश आहे. लेखकाने त्यांच्या विचारांची यथोचित अवतरणे पुस्तकात दिली असल्याने एक संदर्भग्रंथ म्हणूनही आगळे मोल या ग्रंथाला लाभले आहे. शेवटची सूची अभ्यासकांसाठी उपयुक्त आहे.

श्री समर्थ रामदास : एक अभ्यास
लेखक : सुरेश जाखडी
प्रकाशक : विजया प्रकाशन, मुंबई
पृष्ठे : 488 मूल्य : 500/- रुपये