
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्य सरकारने घोषित केलेल्या संचारबंदीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी दिले.
विद्यापीटाच्या वतीने सध्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. संभाजीनगर शहरासह मराठवाडा विभागात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे.
राज्य सरकारने 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून कडक संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यापीठाने विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी वर्ग यांच्या आरोग्याची काळजी घेत पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा स्थगित केल्या आहेत.
स्थगित करण्यात आलेल्या पदवीच्या परीक्षा 3 मे आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा 5 मे पासून पुन्हा घेतल्या जाणार आहेत. त्यासंबंधीचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.































































