‘ट्वेल्थ फेल’ची प्रेरणादायी कहाणी

 

 

हैदराबादचे डॉ. मुरली कृष्ण प्रसाद दिवी म्हणजे औषध घटक निर्मितीच्या क्षेत्रातील मोठे नाव. डॉ. दिवी यांच्या ‘दिवीज लॅबोरेटरी’चे नाव ऑक्टिव फार्मास्युटिकल इंग्रिडियंट (एपीआय)चे उत्पादन करणाऱया जागतिक पातळीवरील टॉप थ्री पंपन्यांमध्ये घेतले जाते. बारावी नापास मुलगा ते आज हैदराबादचा सर्वात श्रीमंत इसम होण्याचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता.

डॉ. मुरली कृष्ण प्रसाद दिवी मूळचे आंध्र प्रदेशच्या मछिलीपटनम येथील शेतकरी कुटुंबातील. वेगळी वाट निवडून ते फार्मास्युटिकल इंडस्ट्रीकडे वळले. बीफॉर्म आणि एमफार्म केल्यानंतर पुढे नशीब आजमवण्यासाठी खिशात सात डॉलर घेऊन ते अमेरिकेत पोहोचले. पुढे कुटुंबावर आलेल्या संकटामुळे ते हिंदुस्थानात परतले. डॉ. दिवी यांनी डॉ. अंजी रेड्डी यांच्या पंपनीत कामाला सुरुवात केली. डॉ. रेड्डी यांच्यासोबत ‘केमिनोर ड्रग’ पंपनीत भागीदारीची संधी त्यांना मिळाली. या पंपनीला अमेरिकेच्या फूड अॅण्ड ड्रग प्रशासनाची मंजुरी मिळाली. अशी मंजुरी मिळवणारे ते हिंदुस्थानातील पहिले एपीआय युनिट ठरले. पुढे या पंपनीतून बाहेर पडत डॉ. दिवी यांनी  अन्य पंपन्यांना कन्सलटिंग करायला सुरुवात केली. 1994 त्यांनी मोठा डाव खेळला. स्वतःजवळची जमापुंजी खर्च करून नालगौडा येथे ग्रीनफिल्ड एपीआय युनिट उभारले. त्याला ‘दिवीज लॅबोरेटरीज’ असे नाव दिले. यासाठी बँकेतून 35 कोटींचे कर्ज घेतले. हे कर्ज अवघ्या पाच वर्षांत त्यांनी फेडले.

कोणत्याही मोठय़ा फार्मा पंपन्यांसोबत कायदेशीर पेचात अडकायचे नाही. कुठल्याही पेटंटचे उल्लंघन करायचे नाही, ही दिवीज लॅबोरेटरीजची तत्त्वे आहेत. आम्ही आमच्या ग्राहकांसोबत स्पर्धा केली नाही, त्यांना पूरक अशी भूमिका घेतली. ग्राहक देव आहेत. परिणामी आज आम्ही जगातील टॉपच्या दहा पंपन्यांसोबत काम करतोय, असे डॉ. दिवी यांनी सांगितले.