
>> डॉ. समिरा गुजर जोशी
[email protected]
पावसाचे मानवी भावभावनांशी घट्ट नाते आहेच. आपल्या हिंदी सिनेमात नाही का प्रेमप्रसंग असू दे किंवा रहस्यमय घटना. पावसाचं असणं त्या प्रसंगाची रंगत वाढवतो, पण कालिदास प्रेम आणि पाऊस यांचे नाते रंगवतोच, पण निसर्गातल्या छोटय़ा-छोटय़ा घटनांची कशी नोंद ठेवतो ते वाचण्यासारखे आहे.
सध्याच्या वाढत्या तापमानात हाश हूश करत उन्हाळा कधी संपणार याची वाट आपण पाहत आहोत. अशा वेळी या असह्य उन्हाळय़ाचे कालिदासाने केलेले हे रम्य वर्णन अतिरंजित वाटू शकते. पहा तो काय म्हणतो आहे – रसिका, पाण्यात कमळांची वने फुलली आहेत, पाटल फुलांच्या सुगंधाने रम्य झालेला असा उन्हाळा, सुखद पाणी पाण्याचे फवारे उडत आहेत, अशा गच्चीवर आनंददायी चंद्रप्रकाशात रात्री सुस्वर गीते ऐकण्यात आणि सुंदर तरुणींच्या सहवासात आनंदाने पुढे जावो.
उन्हाळय़ासारख्या रुक्ष ऋतूचे वर्णन जर कालिदास इतक्या मनोज्ञ पद्धतीने करत असेल तर वर्षा ऋतूचे वर्णन करताना तो सुखाच्या सरींमध्ये न्हाऊन निघत असेल यात काय शंका आहे.
पावसाचे वर्णन करणारी अनेक गाणी आणि कविता यांचा आपण आनंद घेतलेला असतो. त्यापेक्षा कितीतरी वेगळ्या पठडीचे आणि चाकोरी बाहेरचे वर्षा ऋतुवर्णन आपल्याला ऋतुसंहार या काव्यात वाचायला मिळते. सुरुवातच होते ती एका अभिनव कल्पनेने…मेघांची स्वारी येते, पावसाळा येतो तो कसा तर एखाद्या राजाचे आगमन व्हावे तसा…पावसाचे काळे ढग म्हणजे माजलेली हत्ती आहेत. चमकणारी वीज ही मेघराजाची ध्वजा आहे आणि होणारा गडगडाट म्हणजे राजाच्या स्वागतासाठी वाजणारे नगारे आहेत. ढग म्हणजे आसमंत दुमदुमून सोडणारे नगारे आहेत, तर पावसाच्या धारा म्हणजे इंद्रधनुष्याची प्रत्यंचा ताणून सोडलेले असंख्य बाण आहेत. जे जमिनीकडे झेपावून प्रेमीजनांच्या मनाला डागण्या देत आहेत.
पाऊस हा काळ कामीजनांना प्रिय काळ आहे. कारण हा मिलनाचा काळ आहे. पावसाळ्यात कितीही लांब गेलेला प्रियकर हा दळणवळणाची साधने बंद होण्यापूर्वी आपल्या घरी परतत असे. म्हणून तर आषाढाच्या पहिल्या दिवशी आकाशात काळा ढग पाहिल्यानंतर कालिदासाच्या यक्षाला आपल्या प्रियेला निरोप पाठवावा असे वाटले.
पावसाचे मानवी भावभावनांशी घट्ट नाते आहेच. आपल्या हिंदी सिनेमात नाही का प्रेमप्रसंग असू दे किंवा रहस्यमय घटना… पावसाचं असणं त्या प्रसंगाची रंगत वाढवतो, पण कालिदास प्रेम आणि पाऊस यांचे नाते रंगवतोच, पण निसर्गातल्या छोटय़ा-छोटय़ा घटनांची कशी नोंद ठेवतो ते वाचण्यासारखे आहे.
तुम्हाला इन्द्रगोप किडे आठवतात का? त्याला काही ठिकाणी मृगाचा किडाही म्हणतात. लाल रंगाचा, मखमाली शरीराचा हा किडा पावसाळ्याच्या सुरुवातीला जमिनीतून बाहेर पडतो. कालिदास म्हणतो की, हिरव्या गवतावर हे लाल भडक जीव दिसू लागले की वाटते पृथ्वीने रत्नजडीत हार धारण केला आहे. अलीकडे रसायनांच्या अतिरिक्त वापरामुळे कदाचित हे मृग किडे फारसे दिसत नाहीत. कविकुलगुरू कालिदासाने मात्र आपल्या काव्यात स्थान देऊन त्यांना काव्यात अजरामर केले आहे किंवा हे उदाहरण पहा- वनात काय नाटय़ निर्माण झाले आहे? तर मेघ दिसले म्हणून मोर आनंदाने पिसारा फुलवून नाचत आहेत. भुंगे बिचारे कमळाच्या शोधात फिरत होते. त्यांना अचानक हा रंगीबेरंगी सुंदर पिसारा दिसला.
ही निळी कमळे वाटून झेपावले ना ते आणि मग फसले बिचारे भुंगे किंवा पाऊस सुरू झाल्यावर जागोजागी पाण्याचे ओहोळ वाहू लागले आहेत पण ते कसे? सापाच्या गतीने नागमोडी वळणे घेत पाणी पर्वताच्या सांदी कोपऱयातून वाहते आहे. बिचारे बेडूक तो पाण्याचा नागमोडी प्रवाह पाहून घाबरून गेले आहेत. त्यांना त्या पाण्यात सापाचा भास होतो आहे ना किंवा नवघनांच्या गर्जनांना प्रत्युत्तर म्हणून पुनपुन चित्कार करणाऱया माजलेल्या हत्तींनी रान दणाणून गेले आहे. हे हत्ती इतके माजावर आलेले तरुण सुंदर हत्ती आहेत. असं वाटतं आहे की, त्यांच्या कापाळावर कुणी निळ्या कमळांच्या माळा घातल्या आहेत. पण अजून तर कमळे फुलली नाहीत, मग यांना कुठे मिळाली निळी कमळे? तर मदाने त्यांची गंडस्थळे सुगंधित झाली आहेत म्हणून भुंग्यांच्या थव्यांनी त्यांच्या कपाळावर गर्दी केली आहे. त्या भुंग्यांमुळे ती गंडस्थळे निळ्या कमळासारखी चमकदार वाटतात. अशा किती सुंदर चमत्कृती निसर्गात घडत आहेत. कारण ऋतुंचा राजा – मेघराज – पावसाळा आला आहे.
(लेखिका निवेदिका, अभिनेत्री आणि
संस्कृत – मराठी वाङमयाच्या अभ्यासव आहेत.)
























































