
वैज्ञानिक संशोधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. श्रीया शेटये यांची युरोपियन रिसर्च कौन्सिलच्या प्रारंभिक संशोधन कार्यासाठी देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठत अनुदानासाठी निवड झाली आहे. त्यांच्या MERLIN या महत्त्वाकांक्षी संशोधन प्रकल्पासाठी हे अनुदान मंजूर झाले आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी संशोधन करणाऱ्या त्या हिंदुस्थानी वंशाच्या एकमेव महिला संशोधक ठरल्या आहेत.
डॉ. श्रीया शेटये या सध्या बेल्जियममधील Universite libre de Bruxelles आणि KU Leuven येथील खगोलशास्त्र संशोधनाशी संबंधित आहेत. त्यांच्या प्रकल्पाचे यजमान संस्थान ULB आहे. याच वर्षी ERC Starting Grant मिळविणाऱ्या संशोधकांमध्ये डॉ. श्रीया शेटये यांच्यासह महाराष्ट्रातील डॉ. कौस्तुभ हकीम आणि भूतानचे डॉ. पार्थ चानसोरिया यांचाही समावेश आहे. श्रीयाने आपल्या वैज्ञानिक कर्तृत्वातून युरोपच्या भूमीवर मराठीचा झेंडा फडकवला असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
तारकांच्या अंतरंगातील गूढ उलगडणार
MERLIN प्रकल्पातून प्रौढ अवस्थेकडे वाटचाल करणाऱया तारकांच्या अंतर्गत भागातील चुंबकीय क्षेत्रांचा त्यांच्या उत्क्रांतीवर तसेच रासायनिक संरचनेवर होणारा परिणाम अभ्यासला जाणार आहे. विशेषतः AGB (Asymptotic Giant Branch) अवस्थेतील तारकांचा या संशोधनात सखोल अभ्यास केला जाणार आहे. कार्बन आणि जड मूलद्रव्यांच्या निर्मिती व प्रसारामध्ये या तारकांची महत्त्वाची भूमिका असते.



























































