भुकेने विव्हळत असलेल्या श्वानांना साखळदंडात जखडून ठेवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सामना प्रतिनिधी । कल्याण
कल्याणच्या हायप्रोफाईल सोसायटीत क्रूरतेचा कळस आज पाहावयास मिळाला. एका डॉक्टरने नऊ श्वानांना अर्धपोटी ठेवून साखळदंडात जखडून ठेवल्याची घटना उघड झाली. श्वानांना दयनीय अवस्थेत डांबून ठेवणाऱया डॉ. विरेंद्रपालसिंग बेदी यांच्याविरुद्ध खडकपाडा पोलिसांनी प्राणी क्रूरता कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण पश्चिम येथील गोदरेज हिल परिसरात डॉ. विरेंद्रपालसिंग बेदी यांचा टुमदार बंगला आहे. काही दिवसांपासून बंगल्यातून कुत्र्यांचा विव्हळत असल्याचा आवाज रहिवाशांना येत होता. वाशीतील एनजीओचे कार्यकर्ते चेतन शर्मा यांना याबाबतची माहिती दिली. त्यांनी येथे येऊन अधिक माहिती घेतली असता श्वानांना अत्यंत क्रूरतेने डांबून ठेकल्याचे लक्षात आले. चेतन शर्मा यांनी आज खडकपाडा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांसह त्यांनी बंगल्याकर धडक दिली असता सर्वांनाच धक्का बसला. अत्यंत देखणे आणि महागडे समजले जाणारे परदेशी जातीचे (फॉरेन ब्रीड) नऊ श्वान अत्यंत हलाखीच्या आणि मरणासन्न अवस्थेत साखळदंडात जखडून ठेवले होते. कित्येक दिवसांपासून या श्वानांना कोंदट जागेत आणि अर्धपोटी ठेवले होते. धक्कादायक बाब म्हणजे काही श्वान भुकेपोटी आपलीच विष्ठा खात असल्याचे पाहून सर्वजण हादरून गेले.
उपचारासाठी श्वानांना तुर्भेत हलवले
या सर्व श्वानांची बंगल्यातून सुटका करून त्यांना काही वेळ खडकपाडा पोलीस ठाण्याबाहेर बांधण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर तातडीने औषधोपचार आवश्यक असल्याने या सर्वांना चेतन शर्मा यांच्या तुर्भे येथील केंद्रात हलवण्यात आले. सुटका करण्यात आलेल्या या श्वानांमध्ये तीन सायबेरीयन हस्की, एक डोंगो अर्जेंटिनो, एक सेंट बर्नार्ड, तीन गोल्डन रेटव्हिवर, एक फ्रेंच मॅस्टीफ अशा विविध प्रजातींचा समावेश आहे.
नफेखोर डॉक्टर
बेदीकडे असणाऱ्या एका कुत्र्याच्या पिलाची किमतच सुमारे ७० हजारांच्या घरात आहे. विरेंद्रपालसिंग बेदी हा या कुत्र्यांचे ब्रीडिंग करून त्यातून लाखो रुपये कमवत असूनही श्वानांना मात्र अर्धपोटी ठेवत होता. पोलिसांनी बेदी यांच्याविरोधात प्राण्यांचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.