
युगांडा येथून मुंबईत आलेल्या महिलेने पोटात लपवलेले तीन कोटी रुपयांचे ड्रग्ज एनसीबीने जप्त केले. जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्या पोटातून हेरॉईन आणि कोकेनचे पॅकेट्स बाहेर काढले. ड्रग्ज तस्करी करणाऱया महिलेला एनसीबीने अटक केली.
युगांडा येथून एक महिला ड्रग्ज घेऊन मुंबईत येणार असल्याची माहिती मिळताच एनसीबीने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर फिल्डिंग लावली होती. त्यानुसार संशयित महिलेच्या बॅगेची तपासणी केली, मात्र त्यात काही आढळले नाही. त्यामुळे तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. जे. जे. रुग्णालयात जाऊन एक्स रे काढला असता तिच्या पोटात संशयास्पद वस्तू दिसल्या. त्यानुसार डॉक्टरांनी त्या महिलेच्या पोटातून 64 कॅप्सूल काढत त्यामध्ये असलेले 535 ग्रॅम हेरॉईन आणि 175 ग्रॅम कोकेन एनसीबीने जप्त केले.

























































