
दुबई येथून नगरमध्ये परतलेल्या चार जणांना कोरोना लागण झालेली नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहे.
दरम्यान, या चौघांना आज सकाळी येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी याबाबत माहिती दिली.
पुण्याच्या एका नामांकित ट्रॅव्हल कंपनी काहीजण सहलीसाठी बाहेर देशांमध्ये गेले होते. दुबई या ठिकाणी या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. पुणे शहरामध्ये दोन कोरोनाचे रुग्ण आणल्यानंतर त्यांच्यासमवेत जे जे कोणी होते , त्यांची सुद्धा तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते. नगर शहरामध्ये काल चार जण हे दुबई येथून आल्याचे समोर आले होते. वास्तविक पाहता प्रशासनाने त्यांची अगोदरच विचारपूस केली होती व त्यांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला होता. आज या चौघांचे रक्ताचे नमुने तसेच घशातील स्त्रावाचे नमुने हे तपासणीसाठी पुणे येथे पाठवले असून त्यांचा अहवाल 24 तासांमध्ये प्राप्त होईल, असे सांगण्यात आले आहे.
























































