युवापिढीने देशाशी एकनिष्ठ राहून सामाजिकतेचे भान ठेवावे -डी. वाय. एस. पी. फडतरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

एकता आणि शांतता देशाचा विकास घडविते कर्मठ धर्मवाद आणि जातीयवाद देशातच नव्हे तर जगामध्ये अशांतता निर्माण करतो. देशातील अशांतता देशाला अस्थिर बनविते. त्यासाठी देशातील शांतता अबाधित ठेवा. देशप्रेम जागृत ठेवा म्हणजे देशाची प्रगती वेगाने होईल. देशामध्ये अस्थिरता निर्माण करणार्‍या अपप्रवृतींच्या मायाजालामध्ये न फसता युवापिढीने देशाशी एकनिष्ठ राहून सामाजिकतेचे भान ठेवत देश घडवायला व त्याचे रक्षण करायला तत्पर रहावयास हवे असे उद्गार कुडाळ पोलीस ठाण्याच्या डी.वाय.एस.पी कविता फडतरे यांनी काढले.

बॅ. नाथ पै शिक्षण संस्था (सिंधुदुर्ग), ध्येय प्रतिष्ठान कुडाळ, तालुका पत्रकार समिती आणि कुडाळ पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शूरवीरांना व बळी पडलेल्या निरपराध नागरिकांना श्रध्दांजली अर्पण करण्याच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्या आपले मनोगत व्यक्त करत होत्या. त्यांनी आपल्या भाषणात पुढे सीमेपलिकडील दहशतवाद देशात येऊन देश पोखरू लागलाय याचा आपण देशवासीयांनी विचार करून देशनिष्ठेच्या जोरावर त्याला हद्दपार करूया असे सांगितले. तसेच उत्तम आयोजनाबद्दल व देशनिष्ठानिर्माण करण्याच्या स्त्युत्य उपक्रमाचे कौतुक केले.

सुरवातीलाच सेंन्ट्रल स्कूलच्या शिक्षक- विद्यार्थ्यांनी प्रांगणात उभारलेल्या शहीदांना डी.वाय.एस.पी कविता फडतरे यांनी श्रध्दांजलीसाठीच्या स्तंभासमोर पुष्पचक्र अर्पण करून स्काऊट गाईडच्या व सर्व अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शहींदांना मानवंदना दिली.

त्यानंतर बी.एड च्या छात्रध्यापिकांनी 26/11 च्या हल्ल्यातील क्षणचित्रांचे प्रदर्शन त्यांची कल्पकतेची स्तुती केली. स्काऊट गाईडच्या राज्यसमितींच्या सहाय्यक कमिशनर श्रीमती सुलभा देसाई, बॅ.नाथ पै महिला आणि रात्र महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य अरूण मर्गज, बी.एड कॉलेजचे प्र.प्राचार्य परेश धावडे, नर्सिंग कॉलेजचे प्र. प्राचार्य सिध्दार्थ हरेर, सेंन्ट्रल स्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापिका मधुरा इन्सुलकर, कुडाळ पोलीस ठाण्याच्या पी.एस.आय शीतल पाटील उपस्थित होत्या.

यावेळी 26/11च्या हल्ल्यातील चित्रफित दाखवत काही वीरगीते सादर केली व शहींदांना सर्वांनी श्रध्दांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत प्रा. अरूण मर्गज यांनी केले व सुत्रसंचालन पूजा मेस्त्री हिने तर प्रा. योगिता शिरसाट यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी विविध अभ्यासक्रमाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.