
विद्यार्थ्यांना आपल्या विळख्यात घेत असलेल्या अत्यंत घातक अशा ई-सिगारेटच्या खरेदी-विक्रीचा बाजार आर्थिक गुन्हे शाखेच्या सी.बी. कंट्रोल युनिटने उद्ध्वस्त केला. तरुणांव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना विकण्यासाठी आणलेल्या हजारो ई-सिगारेटचा धूर पोलिसांनी निघूच दिला नाही. आग्रीपाडा परिसरात पथकाने धडक कारवाई करत तब्बल 58 लाख 50 हजार किमतीचा पाच हजार 500 ई-सिगारेटचा साठा जप्त केला.
ई-सिगारेटला माचिस अथवा लायटरची गरज नाही. दम मारल्यानंतर तोंडाला त्याचा उग्र वासही येत नाही. पाहिजे तेव्हा दम मारून बंद करून ठेवता येते. शिवाय वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये उपलब्ध असल्याने शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये ई-सिगारेटची मागणी वाढू लागली आहे. सीबी कंट्रोल युनिटने त्याची गंभीर दखल घेत केलेल्या कारवाईत एका टेम्पोतून 34 लाख 50 हजार आणि सिगारेटची डिलिव्हरी देण्यासाठी आलेल्या व्यक्तीकडून 24 लाख रुपये किमतीचा ई-सिगारेटचा साठा जप्त केला.
पाच महिन्यांत 19 ठिकाणी कारवाया
नितीन पाटील व त्यांच्या पथकाने जुलै महिन्यापासून शहरातील 19 विविध ठिकाणी धडक कारवाया करत लाखो रुपये किमतीचा ई-सिगारेटचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत 19 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

























































