अग्रलेख: पावसाचा कहर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात पावसाचा हा धुमाकूळ सुरू असला, कोकणपट्टी चिंब भिजून हिरवळीने नटली असली आणि राज्याच्या बऱ्याच भागांत मान्सून पोहोचला असला तरी काही जिल्ह्यांना मात्र त्याची अजून प्रतीक्षा आहे. महाराष्ट्रातील पर्जन्यमानाची स्थिती ही अशी संमिश्र आहे. अर्थात हे प्रारंभीचे चित्र आहे. उद्या ते सुधारू शकते. तूर्त मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिह्यांत पावसाने जो कहर केला आहे आणि वेधशाळेने जो अतिवृष्टीचा इशारा दिला आहे त्याबाबत सरकार, स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिह्यांत मागील तीन दिवसांपासून आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळत आहे. या तीन दिवसांत मुंबईमध्ये १ हजार ३६३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यावरूनही मुंबईच्या आकाशातून किती पाणी कोसळले असेल याचा अंदाज येऊ शकतो. फक्त मंगळवारच्या सकाळच्या तीन तासांचा विचार केला तर कुलाब्यात ४० मिलीमीटर, दादर ६३ मि.मी., अंधेरी ४१ मि.मी., बोरिवली ६० मि.मी., पनवेल ६१ मि.मी. अशी तुफान फटकेबाजी पावसाने केली आहे. ठाणे, पालघर आणि रायगड जिह्यांतील वसई, विरार, नालासोपारा, कर्जत, कल्याण, डोंबिवली, पालघर हा सर्व भाग जलमय झाला आहे. सोमवार सकाळपर्यंत फक्त वसईमध्ये १ हजार ३४३ मिलीमीटर पाऊस पडला. काही वर्षांपूर्वी आलेली ‘२६ जुलै’ची अस्मानी मुंबईकर विसरू शकलेले नाहीत. सुदैवाने तेवढी भीषण स्थिती या पावसाने सध्या निर्माण झालेली नसली तरी त्या आपत्तीची आठवण त्यामुळे झाल्याशिवाय राहत नाही. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे सलग तीन दिवस प्रचंड पाऊस कोसळूनही मुंबई ठप्प झाली नाही, मुंबई हे ‘धावणारे शहर’ आहे. त्यामुळे

सलग होणाऱ्या पर्जन्यवृष्टीने

शहराची गती मंदावणारच, जनजीवन विस्कळीत होणारच. मुंबईची जीवनवाहिनी असणाऱया लोकल गाडय़ांचा वेग कमी होणे, ठरावीक भागांत पाणी साचणे, रस्त्यावर वाहतूककोंडी होणे वगैरे अडचणी मुंबईसाठी नवीन नाहीत. त्यावर मात करण्यासाठी मुंबई महापालिका आणि इतर यंत्रणा नेहमीच सज्ज असतात. शिवाय पावसाच्या तडाख्यात मुंबई प्रत्यक्ष सापडते तेव्हादेखील ही यंत्रणा अहोरात्र कार्यरत असते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या विहार आणि तुळशी तलावात जेवढा पाणीसाठा असतो त्यापेक्षा जास्त पाणी या तीन दिवसांत मुंबई महापालिकेच्या यंत्रणेने उपसले आणि त्याचा निचरा केला. त्यामुळेच मुंबई ठप्प झाली नाही. एरवी मुंबईतील पाऊस आणि महापालिकेच्या नावाने खडे फोडणाऱ्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे. अर्थात, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात पावसाचा हा धुमाकूळ सुरू असला, कोकणपट्टी चिंब भिजून हिरवळीने नटली असली आणि राज्याच्या बऱ्याच भागांत मान्सून पोहोचला असला तरी काही जिल्ह्यांना मात्र त्याची अजून प्रतीक्षा आहे. विदर्भातील गोंदिया, बुलढाणा वगैरे भाग कोरडा आहे. ठाणे, रायगडला धो-धो पडणारा पाऊस नाशिकवर

अद्याप प्रसन्न

झालेला नाही. गेल्या वर्षी नाशिकच्या पदरात पावसाने भरभरून दान टाकले होते. एवढे की, त्यामुळे मराठवाड्याचे जायकवाडी धरण कित्येक वर्षांनी भरले होते. यंदा मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत इगतपुरी, त्र्यंबकेश्वर वगळता नाशिक जिल्हा कोरडाच आहे. त्यामुळे खरिपाच्या नियोजनाचा फेरविचार करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येण्याची भीती आहे. बाकीचा उत्तर महाराष्ट्रही अद्याप पावसाच्या प्रतीक्षेतच आहे. मराठवाड्यात नांदेड, लातूर, धाराशीव, बीड, हिंगोली जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी इतर भागांत ढगाळ वातावरण आणि गार वारे एवढ्यावरच ‘पावसाळ्याचे समाधान’ मानावे लागत आहे. संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत १५ टक्केच पाऊस झाल्याने जुलै निम्मा होत आला तरी तेथे टँकरद्वारा पाणीपुरवठा सुरू आहे. येथील पेरण्यांची स्थितीही बिकट आहे. पश्चिम महाराष्ट्रातही काही जिल्ह्यात कृपा, तर काही जिल्ह्यांत अवकृपा असेच चित्र आहे. महाराष्ट्रातील पर्जन्यमानाची स्थिती ही अशी संमिश्र आहे. अर्थात हे प्रारंभीचे चित्र आहे. उद्या ते सुधारू शकते. तूर्त मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिह्यांत पावसाने जो कहर केला आहे आणि वेधशाळेने जो अतिवृष्टीचा इशारा दिला आहे त्याबाबत सरकार, स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.