
सामना ऑनलाईन । मुंबई
सामाजिक तेढ निर्माण करणारा व्हिडीओ बनवून तो प्रसारमाध्यमांद्वारे व्हायरल करणारा अनिभेता एजाज खान अखेर अडचणी आला. समाजभावना दुखावणारा व्हिडीओ प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून मुंबई सायबर पोलिसांनी एजाजला अटक केली आहे.
नेहमीच कुठल्या न कुठल्या कारणांमुळे वादग्रस्त ठरलेला एजाज याने यावेळी केलेला आगाऊपणा त्याला चांगलाच भोवला आहे. त्याने सामाजिक तेढ निर्माण होईल असा वादग्रस्त भाष्य करणारा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियातून व्हायरल केला. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात एजाजविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी सायबर पोलिसांनी कलम 153 (अ), 34 भादंवि तसेच आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करून एजाज खान याला अटक केली आहे.


























































