‘मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही’, एकनाथ खडसेंच्या आरोपांना फडणवीस यांचे उत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे. एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांचा ‘ड्राय क्लीनर’ असा उल्लेख करत त्यांच्यावर आरोप केले होते. खडसे यांनी केलेल्या आरोपांना आज फडणवीस यांनी उत्तर दिले असून ‘मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही’, असे म्हणत खडसे यांना टोला लगावला आहे.

आमचे मुख्यमंत्री ड्राय क्लीनर होते. आरोप झाला की क्लीन चिट द्यायये, पण नाथाभाऊंना दिली नाही. माझ्यावर एवढा राग का, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, माझ्यात खूप संयम असून मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही. खडसे आमचे ज्येष्ठ नेते असल्याने मी त्यांच्यावर टीका, टिप्पणी करणार नाही असेही फडणवीस म्हणाले.

खडसे यांनी उल्लेख केलेल्या मनीष भंगाळे प्रकरणावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ज्या मनीष भंगाळे प्रकरणावर ते बोलत आहेत त्या प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला नाही. उलट भंगाळे यांनी आरोप केल्यानंतर मी समिती नेमली आणि अवघ्या 12 तासात अहवाल देण्यास सांगितले. 12 तासात खडसे यांनी क्लिन चिट मिळाली आणि भंगाळेला उचलून तुरुंगात टाकले, कित्येक दिवस तो तुरुंगात होता. त्या क्लिन चिटला देखील ते ड्राय क्लीनर म्हणत असतील तर माहिती नाही, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच त्यांना एमआयडीसी प्रकरणात राजीनामा द्यावा लागला, असेही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, ‘जनसेवेचा मानबिंदू’ या एकनाथ खडसे यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे ऑनलाइन प्रकाशन जळगाव मुक्ताईनगर येथे करण्यात आले. लोक म्हणतात नाथाभाऊ यांचे काही अडकले असेल म्हणून पक्षात अन्याय होऊनही ते पक्ष सोडत नाहीत. असे काही नाही. मी पक्षाविरोधात कधीही बोललो नाही. मला देवेंद्रजींच्या माध्यमातून त्रास झाला हे नाव घेऊन सांगतो. चुकीच्या निर्णयाविरुद्ध बंड करण्याची धमक आपल्यामध्ये असल्याचे खडसे यांनी ठणकावून सांगितले. तसेच मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी आपल्याविरुद्ध रचलेल्या कारस्थानांचे सगळे पुरावे आता आपल्याला मिळाले आहेत. दाऊदच्या बायकोवरून झालेले आरोप, मनीष भंगाळे प्रकरण आणि त्याला दिली गेलेली सन्मानाची वागणूक याबाबत लवकरच ‘नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान’ हे पुस्तक लिहून आपल्याविरुद्ध रचलेल्या कारस्थानांचा भंडाफोड करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.