
सामना प्रतिनिधी । नांदेड
नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्या तीन सदस्यांना निवडून देण्यासाठी जिल्हाधिकारी नांदेड यांनी आज निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, २८ डिसेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे. यात नऊ जिल्ह्यातील १२ हजार ७१४ मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्या तीन सदस्यांना निवडून देण्यासाठी शीख मतदारांची यादी तयार करण्याचे काम गेल्या दोन महिन्यापासून सुरु होते. या निवडणुकीत संभाजीनगर, नांदेड, जालना, धाराशिव, चंद्रपूर, परभणी, बीड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यातील शीख बांधवांनी नोंदणी केली आहे. त्यानुसार संभाजीनगर-२६२८, नांदेड-८२०७, चंद्रपूर-१२८, जालना-५९५, परभणी-४८२, बीड-२८८, लातूर-१८६, हिंगोली-१९६ आणि धाराशिव-४ असे १२ हजार ७१४ स्त्री, पुरुष मतदार या निवडणुकीच्या मतदानासाठी पात्र ठरले आहेत.
या निवडणुकीसाठी २६ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज स्विकारण्यास प्रारंभ होईल व १ डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. नामनिर्देशन पत्राची छाननी ३ डिसेंबर रोजी तर वैध नामनिर्देशन पत्रांची सूची छाननी संपल्यानंतर त्याच दिवशी म्हणजे ३ डिसेंबरलाच प्रसिध्द करण्यात येईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ६ डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. ६ डिसेंबरलाच उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे व त्यांना चिन्ह नेमून देण्याचे काम पूर्ण करण्यात येईल. २८ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते ५.३० वाजेपर्यंत संबंधित मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येईल.
२९ डिसेंबर रोजी संबंधित मतमोजणी केंद्रावर मतमोजणी करण्यात येईल व ती मतमोजणी संकलन करुन ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता निकाल जाहीर करण्यात येईल. एका उमेदवारास जास्तीत जासत चार नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील व नामनिर्देशन पत्रासोबत दोनशे रुपये अनामत रक्कम रोखीने जमा करावी लागेल. उमेदवारांसाठी २१ वर्ष वयाची पात्रता असल्याचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.


























































