
सामना प्रतिनिधी, मुंबई
पालिकेच्या वैधानिक समित्यांची निवडणूक 3 एप्रिल रोजी होणार असून या वर्षी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या विविध समित्यांवरील पक्षांच्या सदस्यांची नावे आज महासभेत महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांनी जाहीर केली. यात काही जुन्या चेहऱ्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून काही सदस्यांच्या समितीत बदलही झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या वर्षी वैधानिक समित्यांवर अध्यक्ष कोण होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पालिकेच्या वैधानिक समित्यांच्या 50 टक्के सदस्यांची मुदत एक वर्षाने संपल्यानंतर पुन्हा नियुक्ती केली जाते. त्यानुसार दरवर्षी एप्रिलमध्ये या निवडणुका होतात. यानुसार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात स्थायी समिती, सुधार समिती, शिक्षण समिती, ‘बेस्ट’ समितीच्या अध्यक्षांची निवड होणार आहे. दरम्यान, स्थायी समितीत शिवसेनेकडून या वर्षी किशोरी पेडणेकर, चंद्रशेखर वायंगणकर, विजेंद्र शिंदे यांना संधी देण्यात आली आहे. तर शिवसेनेचे विद्यमान स्थायी समिती सदस्य सदानंद परब, मिलिंद वैद्य, समीक्षा सक्रे इतर समित्यांमध्ये सदस्यपदी नियुक्त करण्यात आले आहे. स्थायी समितीमधील भाजपकडून अलका केरकर यांना वगळण्यात आले असून त्यांच्या जागी ज्योती अळवणी यांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून कमरजहाँ सिद्दिकी यांच्या जागी विठ्ठल लोकरे यांना संधी देण्यात आली आहे.
शिक्षण समितीत ‘सपा’ला संधी
शिक्षण समितीमधील ‘मनसे’चे सदस्य कमी झाल्याने त्या जागी समाजवादी पक्षाला आपला एक सदस्य नियुक्त करण्याची संधी मिळाली आहे. या जागेवर समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बेस्ट समितीमध्ये अतुल शाह, सरिता पाटील यांच्या जागी प्रकाश गंगाधरे, मीनल पटेल यांची तर शिवसेनेच्या राजेश कुसळे यांच्या जागी राम सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सुधार, शिक्षण समितीचे नवे चेहरे
सुधार समितीमध्ये शिकसेनेचे संतोष खरात, सदानंद परब, किरण लांडगे यांना तर भाजपकडून शीतल गंभीर, स्वप्ना म्हात्रे, रोहन राठोड, अतुल शाह, अभिजित सामंत, मुमताज खान यांना संधी देण्यात आली आहे. शिक्षण समितीत शिवसेनेचे मिलिंद वैद्य, भाजपच्या सुरेखा पाटील, पंकज यादव यांना संधी देण्यात आली आहे.
























































