विजेच्या विक्रमी मागणीचा राज्य सरकारला धसका

34
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्यात विजेची मागणी झपाटय़ाने वाढत असताना अपुऱया कोळशामुळे ग्रामीण भागात वारंवार भारनियमन करावे लागत आहे. त्याची सरकारने गंभीर दखल घेतली असून औष्णिक ऊर्जेला पर्याय म्हणून तब्बल 8 हजार 355 मेगावॅटचे 12 उदंचन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी वरंधाघाट 800 मेगावॅट आणि गरसगाव 1200 मेगावॅट या दोन प्रकल्पांच्या प्राथमिक अन्वेषण अहवालाला सरकारने मंजुरी दिली आहे.

ऑक्टोबर हीटमुळे राज्यात विजेची मागणी नुकतीच 24 हजार मेगावॅटपर्यंत गेली होती. ही विक्रमी मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणला तीन हजार मेगावॅट वीज खुल्या बाजारातून वाढीव दराने घ्यावी लागली होती. त्या पार्श्वभूमीवर विजेची वाढती मागणी लक्षात घेता सरकारने उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीवर भर दिला आहे. मात्र सध्या राज्यात जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी भौगोलिक स्थिती पूरक नाही. त्यामुळेच उदंचन जलविद्युत प्रकल्पांना चालना दिली असल्याची माहिती राज्याच्या जलविद्युत विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.

काय आहे उदंचन प्रकल्प
उदंचन जलविद्युत प्रकल्पामुळे उपलब्ध असलेल्या पाण्यावर कायमस्वरूपी वीज निर्मिती करता येते. त्यासाठी उंचीवरील ठिकाणी एक धरण आणि त्या तुलनेत खालच्या बाजूला एक धरण बांधावे लागते. विजेची मागणी जास्त असताना उंचीवरील धरणातून दिवसभर वीज निर्मिती करून ग्रीडमध्ये टाकली जाते, तर रात्रभर ग्रीडमध्ये अतिरिक्त असलेली वीज स्वस्त दराने उपलब्ध होत असल्याने पंपाच्या साहाय्याने खालच्या बाजूला असलेल्या धरणातील पाणी वरच्या धरणात सोडले जाते. उपलब्ध पाणी वारंवार वापरून वीज निर्मिती केली जाते. याच पद्धतीने सध्या घाटघर येथे 250 मेगावॅटचा वीज प्रकल्प उभारला आहे.

वीज प्रकल्प – क्षमता (मेगावॅट)
माळशेज – 700
हुंबर्ली – 400
वरसगाव – 1200
पाणशेत – 1600
वरंधाघाट – 800
चिखदरा – 400
आठवण – 1200
कोयना टप्पा – 6400
घाटघर – 1250
मुतखेल – 1200

आपली प्रतिक्रिया द्या