परभणी शहरात वीजवितरणच्या कारवाईबाबत संताप; सर्वसामान्यांना लक्ष्य केल्याचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

शहरात मार्च एंडच्या नावाखाली महावितरणने वसुलीसाठी अ‍ॅटोरिक्षातून वीज ग्राहकांना आवाहन करत कोणतीही पूर्वसूचना न देता, नियम डावलून वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई केली आहे. मोठ्या थकबाकीदारांना अभय देत गरीब व मध्यमवर्गीयांवरच कारवाईचा बडगा उगारला जात आहे. वीज कंपनीच्या या कारवाईबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

वीज वितरणकडून मार्च एंडच्या नावाखाली अत्यल्प बिल थकीत असले तरी वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई करण्यात येत आहे. महावितरणने मनमानी पद्धतीने वीजबिल वसुली करण्यास सुरुवात केल्याचा आरोप नागरिकांना केला आहे. मार्च महिना संपण्यासाठी तीन आठवड्याचा कालावधी असताना आणि वीज ग्राहकांना कोणत्याही देयकाचे वाटप केलेले नसतानाही याद्या घेऊन वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचारी वीज ग्राहकांच्या घरी जावून परस्पर वीज पुरवठा खंडीत करण्याचे काम करत आहेत. वीज पुरवठा खंडीत करण्यापूर्वी किमान सात दिवसाची सूचना वीज ग्राहकांना देणे बंधनकारक असताना केवळ तोंडी सुचनेवरच काम भागवताना दिसत आहेत. वीज वितरण कंपनीने वसुलीसाठी पथक तयार केले आहेत. या पथकामध्ये दोन महिला आणि तीन ते चार पुरषांचा समावेश आहे. वीज बिलाच्या पावतीची मागणी केली जात आहे. पावती दाखविली नाही तर त्या वीज ग्राहकाचा वीज पुरवठा तात्काळ बंद केला जात आहे. 100 ते 500 रुपयांचा आत वीजबिल असतानाही वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई केली जात आहे. हा प्रकार करत असतानाच मोठ्या थकबाकीदांरांकडे साधी विचारणा करण्यासाठीही पथक काम करत असताना आढळून येत नाही. ‘साहेबांचा फोन आला’ असे म्हणत वीज वितरणचे पथक रिकाम्या हाताने परत जात आहे. या दुटप्पीपणाबद्दल वीज ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे.

महावितरणने अद्यापपर्यंत वीजबिल वितरणाचे काम केलेले नाही. तरीही वीजबिल भरणा करण्याचा तगादा का आणि कशासाठी याचे उत्तर मिळत नाही. मार्च एंडच्या नावाखाली परभणी शहरात सध्या महावितरण कंपनी मोठ्या प्रमाणात वसुली करत आहे. वीज कंपनीच्या कार्यालयात तक्रार करण्यासाठी गेलेल्या ग्राहकास ‘आधी वीजबिल भरणा करा, मगच तक्रारीचा विचार केला जाईल’ अशी सूचना वजा ताकीद दिली जात आहे. सक्तीने होणारी विजबिल वसूली थांबविण्यात यावी, अशी मागणी होत आहे. आधी वीज देयके घरोघरी वाटप करण्यात यावीत. त्यानंतरच वसुलीचा तगादा लावावा. केवळ ऑनलार्ईनचे भांडवल करुन महावितरण मनमानी पद्धतीने वीज ग्राहकांना वागणुक देत आहे. ऑनलाईन वीज बिल भरणा करण्याचा आग्रह वीज कंपनीकडून होत आहे. ऑनलाईन पद्धतीबाबत अनेक वीजग्राहक अनभिज्ञ आहेत. याच ऑनलाईनचा आग्रह करत वीज कंपनी टोकाचे पाऊल उचलत वीजपुरवठा खंडीत करत आहे. ही कारवाई नियमबाह्य असून वरिष्ठांनी कर्मचाऱ्यांना सूचना देणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रीया सर्वसामान्य ग्राहकांनी व्यक्त केली आहे.