उल्हासनगरातील १८३ ‘लाडक्या बहिणी’चा रोजगार हिरावला; मालमत्ता कराची बिले वाटपाचे काम बचत गटाकडून काढून घेतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘लाडक्या बहिणीं’च्या नावावर राजकारण करणाऱ्या उल्हासनगर महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी १८३ महिलांचा रोजगार हिरावून घेतला आहे. मालमत्ता कराची बिले वाटण्याचे काम बचत गटाकडून काढून घेतल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान हे काम पुन्हा बचत गटाला द्यावे अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला असून प्रशासनाला तीन दिवसांचा अल्टिमेटमही दिला आहे.

गेल्या १० वर्षांपासून बचत गटाच्या १८३ महिलांना मालमत्ता कराची बिले वाटपाचे काम दिले जात होते. त्याबदल्यात त्यांना प्रत्येक पावती मागे मोबदला मिळायचा. त्यामुळे महिलांना चांगले मानधन मिळत होते. मात्र यंदा हे काम महिला बचत गटाकडून काढून घेऊन महापालिकेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी किंवा खासगी कंत्राटदारांकडे सोपवण्याचा विचार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक महिलांच्या उपजीविकेचा महत्त्वाचा आधार हिरावला जाणार आहे.

शिवसेनेचा प्रशासनाला तीन दिवसांचा अल्टिमेटम
बचत गटाच्या महिलांवर होणाऱ्या अन्यायासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महानगरप्रमुख दिलीप मिश्रा यांनी महापौर अश्विनी निकम, आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्यासह विविध अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे. त्यात पुनर्विचार करून महिलांना पुन्हा बिले वाटपाचे काम द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली असून या महिलांना न्याय मिळाला नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. यावेळी शहरप्रमुख शिवाजी जावळे, भगवान मोहिते, राजन वेलकर, सुरेश पाटील, दशरथ चौधरी, अवतार सिंह, आदिनाथ पालवे, अशोक जाधव उपस्थित होते.