
चित्रपट हिट झाल्यावर त्याचा सिक्वेल येणे ही बाब बॉलीवूड आणि साऊथ इंडस्ट्रीसाठी नवी नाही. हाच ट्रेण्ड गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीतही बऱ्यापैकी रूळला आहे. ऐन मान्सूनमध्ये बॉक्स ऑफिसवर सिक्वेलची बरसात पाहायला मिळणार असून ‘टाईमपास 3’ पासून ते ‘बॉईज 3’ पर्यंत अनेक सिक्वेल आगामी काळात प्रदर्शित होणार आहेत.
‘बॉईज 3’ घालणार राडा
‘बॉईज’ आणि ‘बॉईज 2’ ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः दंगा घातल्यानंतर आता ‘बॉईज 3’ मधून धैर्य, ढुंग्या आणि कबीर हे अतरंगी मित्र बॉक्स ऑफिसवर पुन्हा राडा घालणार आहेत. प्रतीक लाड, पार्थ भालेराव, सुमंत शिंदे हे त्रिकुटच या भूमिका साकारणार आहेत. टीझरमधून त्यांच्या आयुष्यात पुन्हा एक नवीन मुलगी आल्याचे दिसतेय. तिघे काय रंग उधळणार, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर कळेल. विशाल देवरुखकर दिग्दर्शित हा चित्रपट 16 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
‘दगडी चाळ 2’ येतोय
‘दगडी चाळ’ या चित्रपटाच्या तुफान यशानंतर तब्बल सात वर्षांनी ‘दगडी चाळ 2’ येतोय. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कणसे यांनीच केले आहे. येत्या 18 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुफान कोसळणारा पाऊस आणि अनेक लोकांच्या घोळक्यातून मकरंद देशपांडे यांची दमदार एण्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणार आहे हे नक्की.
14 वर्षांनंतर ‘दे धक्का’
‘दे धक्का’ चित्रपटाचा सिक्वेल आता तब्बल 14 वर्षांनी येतोय. दिग्दर्शनाची धुरा महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी सांभाळली असून 5 ऑगस्ट रोजी ‘दे धक्का 2’ प्रदर्शित होईल. शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, सक्षम कुलकर्णी, संजय खापरे, गौरी इंगवले या आधीच्या स्टारकास्टसह प्रवीण तरडे, विद्याधर जोशी, भारती आचरेकर हे कलाकार झळकतील.
‘टकाटक 2’चा धमाका
‘टकाटक’च्या यशानंतर ‘टकाटक 2’ या चित्रपटाबाबत सर्वांच्याच मनात कुतूहल आहे. हा चित्रपट 18 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘टकाटक 2’ मध्ये प्रथमेश परब पुन्हा एकदा मिलिंद कवडे यांच्या चित्रपटाचा नायक बनला आहे. त्याच्यासोबत अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत.
‘दगडू’च्या प्रेमाला फुटणार नवी ‘पालवी’
‘टाईमपास’मधील दगडू आणि प्राजू ही जोडी तरुणाईच्या गळय़ातली ताईत बनली होती. आता ‘टाईमपास 3’ मध्ये पुन्हा एकदा दगडूचा लव्हेबल अंदाज पाहायला मिळणार आहे. त्याच्या आयुष्यात आता डॅशिंग पालवीने एण्ट्री घेतली आहे. पालवीची भूमिका अभिनेत्री हृता दुर्गुळे साकारणार आहे. झी स्टुडिओज निर्मित आणि रवी जाधव दिग्दर्शित या चित्रपटात प्रथमेश परब, मनमित पेम, जयेश चव्हाण आणि ओंकार राऊत पाहायला मिळणार आहे. 29 जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.




























































