George Fernandes कामगार चळवळीची बुलंद तोफ शांत झाली…वादळी जॉर्ज फर्नांडिस यांचे निर्वाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

कामगार चळवळीची बुलंद तोफ, एका हाकेवर मुंबई बंद करणारे बंदसम्राट, जायंट किलर, देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे आज निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. जॉर्ज यांच्या निर्वाणामुळे देशातील कष्टकरी, कामगार, सामान्य जनतेसाठी प्राणपणाने झुंजणारा महान योद्धाच हरपल्याची भावना सर्वच स्तरांतून व्यक्त होत आहे. स्वतंत्र हिंदुस्थानात समाजकारण आणि राजकारण व्यापून टाकणाऱ्या काही मोजक्या लोकनेत्यांमध्ये जॉर्ज फर्नांडिस होते.

गेल्या अनेक वर्षांपासून अल्झायमरसारख्या आजाराने त्यांना ग्रासले होते. शारीरिक व्याधींशी झुंजणाऱ्या जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर काही दिवसांपासून दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. तब्बल 60 वर्षे लढणारे, झुंजणारे वादळ शांत झाले आहे.

बडोदा डायनामाइट केस

आणीबाणीला विरोध म्हणून जॉर्ज आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी एक योजना आखली. इंदिरा गांधी, संजय गांधी यांच्या सभा उधळून लावण्यासाठी स्फोट घडविण्याची ही योजना होती. त्यासाठी बडोदावरून डायनामाइट मागविण्यात आली. यासाठी पत्रकार कीर्ती भट, विक्रम राव, उद्योगपती विरेन जे. शहा यांनी मदत केली. वाराणसी येथे इंदिरा गांधींची सभा होती. सभेच्या चार तास आधी डायनामाइटने स्टेज उडविण्याची योजना होती, पण या योजनेचे बिंग फुटले आणि जून 1976ला जॉर्ज यांच्यासह 25 जणांना अटक झाली. जॉर्ज यांना अक्षरशः साखळदंडाने बांधून नेण्यात आले. जॉर्ज यांच्या भावावर पोलिसांनी एवढे अत्याचार केले की त्याचे दोन्ही पाय निकामी झाले. सीबीआयने खटला दाखल केला. आणीबाणी मागे घेतली गेली. निवडणुका झाल्या तरीही जॉर्ज यांची तुरुंगातून सुटका झाली नव्हती. जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर त्यांच्यावरील खटला मागे घेण्यात आला.

साधी राहणी असलेला बेताज बादशहा

अस्ताव्यस्त केस, सडपातळ अंगयष्टी, जाडाभरडा खादीचा कुर्ता-पायजमा, घासून गुळगुळीत झालेली चप्पल आणि डोळय़ांवर चष्मा असा जॉर्ज यांचा वेश असायचा. 1949 ला ते मुंबईत आले. नगरसेवक ते खासदार ते संरक्षणमंत्री असे अनेक पदांवर राहिले, पण जॉर्ज यांचा हा साधा पोशाख कायम राहिला. जॉर्ज यांच्याविषयी कामगारांमध्ये प्रचंड आपलेपण, कुतूहल असायचे. ते कामगारांचे बेताज बादशहा होते. मध्यमवर्गीय आणि उच्चमध्यमवर्गीयांमध्येही जॉर्ज लोकप्रिय होते. एक डॅशिंग नेता होते.

एका हाकेवर 1974चा रेल्वे चक्का जाम

1973 मध्ये जॉर्ज फर्नांडिस यांची ऑल इंडिया रेल्वेमेंस फेडरेशनच्या चेअरमनपदी निवड झाली. त्यावेळी रेल्वेमध्ये 14 लाख कर्मचारी होते. 8 मे 1974 ला जॉर्ज फर्नांडिस यांनी देशव्यापी रेल्वे संप पुकारला. रेल्वेच्या चक्का जामची हाक दिली. चक्का जामला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. देशात रेल्वेसेवा ठप्प झाली. मुंबईतील टॅक्सी ड्रायव्हर, वीज कर्मचारी संपात सहभागी झाले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तीन आठवडय़ांनंतर लष्कराला बोलावून संप चिरडला. अनेक रेल्वे कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले. या संपानंतर कामगार, कष्टकऱ्यांनी इंदिरा गांधींना स्वीकारले नाही. संपानंतरच सरकारमध्ये अस्वस्थता पसरली. त्यानंतर 1975 ला देशात आणीबाणी

लादली गेली.