
व्यावसायिकाकडे सात लाख रुपयाची खंडणी मागणाऱया दोघांना मालाड पोलिसांनी अटक केली. राहुल निर्मल आणि रवी राजपूत अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
गोरेगाव येथे हा व्यावसायिक राहतो. त्याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. दोन दिवसांपूर्वी ते गोरेगाव येथील कार्यालयात बसले होते. तेव्हा त्यांच्या व्हाट्सअपवर एकाचा मेसेज आला. जर सात लाख रुपये दिले नाही तर जीवे ठार मारू असे त्या मेसेज मध्ये नमूद होते. व्यावसायिकाकडे काम करत असलेल्या त्याच्या चालकाचे नाव आणि ते कार्यालयात किती वाजता येतात हेदेखील लिहिले होते. जर याची माहिती पोलिसांना दिल्यास मुलाची हत्या करू अशी धमकी दिली. त्यानंतर व्यावसायिकाने मालाड पोलीस ठाण्यात धाव घेतली. व्यावसायिकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. वरिष्ठ निरीक्षक रवींद्र अडाणे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, सहायक निरीक्षक कापसे, उप निरीक्षक शिवाजी शिंदे, उपनिरीक्षक तुषार सुखदेवे, काटे, सातवसे आदी पथकाने तपास करून आरोपींना अटक केली.




























































