सुंदर मी होणार – सुंदर पापण्यांसाठी आयलॅश एन्हान्समेंट

>> मृणाल घनकुटे

कॉस्मेटिक सर्जरीच्या जगात आयलॅश एन्हान्समेंट ट्रीटमेंट सध्या खूप चर्चेत आहे. तुम्हाला नाजूक, लांब पापण्या नैसर्गिकरीत्या दिसाव्यात असे वाटते का? जर तुम्ही तुमच्या पापण्यांबाबत समाधानी नसाल तर डोळे सुंदर दिसण्यासाठी

आयलॅश वाढवणे ही एक उत्तम उपचार पद्धती असू शकते. लांबलचक पापण्या तुमच्या सौंदर्यात भर टाकू शकतात. आयलॅश एन्हान्समेंट ट्रीटमेंटबद्दल द एस्थेटिक
क्लिनिक्सच्या कॉस्मेटिक डर्माटोलॉजिस्ट डॉ. देबराज शोम यांच्याकडून जाणून घेतले…

पुरुष असो वा स्त्र्ाया सर्वांना आपले सौंदर्य खूप महत्त्वाचे असते. आपण सर्वजण त्याची काळजी घेण्यात बराच वेळ, मेहनत आणि पैसा खर्च करतो, परंतु कधी कधी काही कारणास्तव आपण आपल्या चेहऱयाच्या वैशिष्टय़ांमध्ये थोडासा बदल किंवा सुधारणा करावी असे आपल्याला वाटू शकते. कॉस्मेटिक शस्त्र्ाक्रिया म्हणजे नेमके तेच करण्याचा एक मार्ग आहे. तुमच्या सौंदर्यातील अपूर्णतेवर मात करण्याचे साधन. आयलॅश एन्हान्समेंट ही एक प्रकारची कॉस्मेटिक शस्त्र्ाक्रिया आहे, जी तुमचे डोळे सुंदर दिसण्यास व हव्या असलेल्या जाड, लांब पापण्या मिळवण्यास सक्षम करते.

 लॅटिस हे यूएस एफडीएद्वारे मंजूर केलेले औषध आहे, जे पापण्या लांब, सुंदर, कुरळे आणि दाट दिसण्यासाठी कार्य करते. लॅटिस हे खरं तर काचबिंदूवर 2001 पासून वापरले जाणारे औषध आहे. उपचारांसाठी हे औषध वापरताना काचबिंदूच्या रुग्णांच्या डोळय़ांच्या पापण्या लांब, चमकदार झाल्याचे
डॉक्टरांच्या लक्षात आले. अशा प्रकारे त्यांना पापण्यांवर लॅटिसचा आश्चर्यकारक प्रभाव आढळला. डोक्यावर वाढणाऱया केसांप्रमाणेच पापण्या उगवतात, वाढतात आणि नंतर गळून पडतात. अशा वेळी लॅटिस त्यांच्यावर कार्य करते, त्यामुळे पापण्या लांब होतात तसेच पापण्यांची संख्या वाढवून त्यांना दाटदेखील बनवते.

अशी आहे उपचारपद्धती…
 आयलॅश एन्हान्समेंट ट्रीटमेंट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही डोळय़ावर केलेला मेकअप आणि कोणतेही कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असाल तर त्या काढून टाका. त्यानंतर चेहरा धुऊन चांगला स्वच्छ करावा लागेल. यानंतर लॅटिस हे औषधांसोबत समाविष्ट असलेल्या विशेष ऍप्लिकेटरसह लागू केले जाते. या प्रक्रियेत प्रत्येक पापणीसाठी आणि प्रत्येक अनुप्रयोगासाठी नवीन ऍप्लिकेटर वापरला जातो.

 पापण्यांवर उत्तम परिणाम दिसण्यासाठी आणि ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारण 16 आठवडे लागतात. ज्याच्या परिणामी पापण्या निश्चितपणे अधिक चांगल्या दिसू लागतात. लॅटिससह उपचार थांबवल्यानंतर पापण्या हळूहळू त्यांच्या प्रारंभिक स्थितीकडे परत येऊ शकतात.