
सामना ऑनलाईन | नवी दिल्ली
सोशल मीडियाच्या जमान्यात ‘म्हातारपण देगा देवा…’ असं म्हणंत आपले फोटो हवे त्या पद्धतीने बनवण्याचा नवा ट्रेंड ‘फेसअॅप’च्या माध्यमाने बाजारात आला आहे. म्हातारपणी आपण कसे दिसू असे फोटो फेसअॅपच्या मदतीने तयार करून सोशल मीडियावर पोस्ट होत आहे. सेलिब्रिटींचे फोटो देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल केले जात आहे. मात्र पहिल्याप्रथम गमतीशीर वाटणारा हा उद्योग खरोखर तुमच्या अंगाशी येऊ शकतो. कारण, या अॅपवरून तुमचा डेटा, फोटो हे जगाला खुले करून देत आहात, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
‘फेसअॅप’ फोटोत बदल घडविताना आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलजीचा वापर करते. हे एक रशियन अॅप असून 2017 सालीच बाजारात आले होते. मात्र या अॅपवरील नवीन अपडेटमुळे हिंदुस्थानसारख्या देशात हे अॅप प्रसिद्ध झाले आहे. खेळाडू, अभिनेते देखील याचा वापर करताना दिसताहेत त्यामुळे या अॅपला चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. फेसअॅप जरी ट्रेंडमध्ये असले तरीही हे वापरण्यासाठी धोकादायक ठरू शकते. कारण हे अॅप इन्स्टॉल करतेवेळी आपली वेब रीक्वेस्ट, आयपी अॅड्रेस, ब्राउझर टाइप या संबंधीची सर्व माहिती रेकॉड केली जाते.
‘फेसअॅप’ पॉलिसी अंतर्गत ही कंपनी युजर्सचा डेटा त्यांचा परवानगी शिवाय कोणत्याही प्रकारच्या जाहिरातीसाठी वापरली जाणार नाही किंवा इतर कोणालाही माहिती देण्यात येणार नाही. मात्र छुप्या मार्गाने अशा प्रकारची परवानगी युजर्सकडून मिळवल्याचा दावा काही नेटकऱ्यांनी केला आहे. फॅसअॅपच्या पॉलिसीनुसार ते त्यांच्याशी निगडीत अन्य कंपन्यांना डेटा देण्याची परवानगी युजरकडून अॅप इन्स्टॉल करतानाच घेतली जाते. तिथून युजर्स डेटा सर्वांसाठी खुला केला जाऊ शकतो, असा तर्क देण्यात आला आहे.
युजर्स अॅपवर फोटो अपलोड करताना ही आपला फोटो वापर करण्याची परवानगी आपल्याकडून आपोआप घेतली गेली असते, असे सायबर सुरक्षा विषयाचे अभ्यासक रॉबट बॅपटाइस्ट यांनी सांगितले आहे. तसेच फोटो अपलोड करतो त्यावेळी तो रशियन कंपनीच्या सर्व्हवर जातो. त्यामुळे त्या फोटोचे हक्क देखील या कंपनीकडे जातात. त्यामुळे अशा अॅप पासून दूर राहण्याचा सल्ला वेब डेव्हलपर जॉशआ नॉजी यांनी ट्विटरद्वारे दिला आहे. हे अॅप फ्री असले तरीही यातील इतर काही फीचर्सचा वापर करण्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागणार आहेत.


























































