सांगली जिल्हा बँकेतही बनावट सोने तारण घोटाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगली जिल्हा बँकेच्या जत तालुक्यातील माडग्याळ येथील शाखेत बनावट सोने गहाण ठेवून 13 लाख 21 हजार रुपयांचे कर्ज उचलल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे. याप्रकरणी सोन्याचे खोटे मूल्यांकन करणाऱया सराफासह सात कर्जदार अशा आठजणांवर उमदी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंकुश रामू घोदे, श्रीकांत गोविंद हुवाळे (दोघे रा. व्हसपेठ), दिलीप सुखदेव सावंत, मच्छिंद्रनाथ शाहू सावंत (दोघे रा. माडग्याळ), शहाजी मारुती तुराई, सिद्धू रतन शिंदे (दोघे रा. राजोबाचीवाडी), धुडाप्पा भीमराव गावडे (रा. सोरडी) या कर्जदारांसह सोन्याचे मूल्यांकन करणारे सुवर्णकार संजय विठ्ठल सावंत (रा. माडग्याळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेचे विभागीय अधिकारी राजेंद्र नाटेकर यांनी उमदी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

सांगली जिल्हा बँकेच्या माडग्याळ येथील शाखेत गोल्ड व्हॅल्युएशनसाठी संजय सावंत या सुवर्णकाराची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी बँकेकडे सोने तारणसाठी आलेल्या सातजणांचे बनावट सोने अस्सल सोने असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. श्रीकांत हुवाळे – 85 हजार, दिलीप सावंत – 16 लाख, मच्छिंद्रनाथ शाहू सावंत – एक लाख 50 हजार, शहाजी मारुती तुराई -पाच लाख 65 हजार, धुडाप्पा गावडे – 15 लाख एक हजार, अंकुश घोदे – 60 हजार, सिद्धू शिंदे – एक लाख 50 हजार असे एकूण 15 लाखांहून अधिक रकमेचे सोने गहाण ठेवले आहे. त्याचे सरासरी 80 टक्क्यांप्रमाणे 13 लाख 21 हजार रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे.

याबाबत जिल्हा बँकेने सोन्याच्या दागिन्यांच्या पुनर्पडताळणीसाठी श्रीशैल विठ्ठल आरगोडी यांची नेमणूक केली होती. तपासणीत हे दागिने बनावट असल्याचे दिसून आले. याबाबतचा पत्रव्यवहार जिल्हा बँकेच्या सरव्यवस्थापकांकडे करण्यात आला. त्यानंतर त्यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. याबाबतची फिर्याद बँकेचे तालुका विभागीय अधिकारी राजेंद्र नाटेकर यांनी उमदी पोलिसांत दिली आहे.