चारा महागल्याने शेतकरी चिंतेत, मका-ज्वारीच्या पेंढ्या 50 रुपये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । धुळे

उन्हाळय़ाला सुरुवात होण्यापूर्वीच चारा महागला आहे. एरव्ही तीनशे रुपये प्रतिक्विंटल या दराने विकला जाणारा चारा सध्या पाचशे रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जात आहे. उसाच्या बांडय़ा, मका-ज्वारीच्या पेंढय़ा 20 ऐवजी 50 रुपयांना विकल्या जात आहेत. त्यामुळे दुभत्या आणि शेतीपयोगी जनावराच्या भरण-पोषणावर किमान दररोज शंभर रुपये खर्च येत आहे. चाऱयाचे दर वाढल्याने पशुपालक चिंताग्रस्त झाले आहेत.

धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि त्यालगतच्या भागात चारा विक्री होते. कोरडा आणि ओला चारा विकताना यंदा विक्रेत्यांचाही कस लागत आहे. कारण, गेल्या वर्षाच्या तुलनेत डिसेंबरमध्ये चाऱयाचे दर महागले आहेत. उपलब्धता कमी असल्याने दरवाढ अपरिहार्य झालेली आहे. सध्या कोरडा आणि ओला चारा उपलब्ध होत आहे. कोरडय़ा चाऱयात गव्हाचे कुटार, ज्वारी-बाजरीचे तोटे आहेत. शिवाय ओल्या चाऱयात मका आणि ज्वारीचा हिरवा चारा उपलब्ध आहे. पाऊस कमी झाल्यामुळे चाऱयाचे उत्पादन घटले आहे. यंदा डिसेंबरमध्येच चाऱयाच्या दरात तीनशेवरून पाचशे रुपये क्विंटल अशी वाढ झाली आहे. कोरडा आणि ओल्या चाऱयाची उपलब्धता कमी झाली आहे. त्यामुळे दरवाढ अपरिहार्य आहे, असे चारा विक्री करणाऱया शकुंतला खरात यांनी सांगितले.

अल्पभूधारक शेतकरी आणि दुभत्या जनावरांचे पालन-पोषण करणारे सर्वसामान्य शेतकरी क्विंटलऐवजी पेंढीच्या पद्धतीने चारा खरेदी करतात. किरकोळ चारा महागडा आहे. मका-ज्वारीची हिरवी पेंढी यापूर्वी आम्ही 20 रुपयांना विकत होतो. परंतु आता तीच पेंढी 50 रुपयांना दिली जाते. चाऱयाच्या दरवाढीमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत, असे शकुंतला खरात यांनी सांगितले.