
गॅस सिलिंडरच्या स्फोटात शेतकऱयाचे घर भस्मसात झाल्याची घटना जावळी तालुक्यातील घोटेघरजवळील सुलेवाडीत घडली आहे. सुदैवाने शेतकऱयाची पत्नी सकाळीच कामाला निघून गेली होती, तर विकलांग असलेला शेतकरी घराबाहेर बसल्याने बचावला आहे. नागू दगडू फरतरे (वय 75) असे शेतकऱयाचे नाव आहे.
घोटेघर डोंगरी भागातील सुलेवाडी गावात नागू फडतरे व त्यांची पत्नी राहतात. आज सकाळी त्यांची पत्नी शेतीकामाला निघून गेली होती. तर, विकलांग असलेले नागू फडतरे हे घराच्या बाहेर बसले होते. त्याचवेळी घरातील गॅस सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला. यात त्यांचे घर आणि घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. संतोष शंकर रांजणे यांनी जीव धोक्यात घालून नागू फरतरे यांना वाचवले.
























































