भाव कोसळल्याने संतप्त शेतकर्‍यांचा रास्ता रोको

77

कांद्याची विक्रमी आवक

मनमाड, (सा.वा.)

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सकाळी लाल कांद्याची विक्रमी आवक झाली. त्यामुळे लिलाव होताना क्विंटलमागे दीडशे रुपयांनी भाव कोसळले. या दरामध्ये कांद्याचा उत्पन्न खर्चही निघत नसल्याने शेतकरी संतप्त झाले. बाजार समिती आणि शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत शेतकर्‍यांनी मालेगाव, चौफुलीजवळ रास्ता रोको केला.

आज सकाळी मनमाड बाजार समिती आवारात ३९० ट्रॅक्टर व पीक अप वाहनांमधून विक्रमी आठ हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. लिलाव सुरू होताच भाव क्विंटलमागे सरासरी १५० रुपयांनी घसरून सरासरी ७०० रुपयांवर आले. काल गुरुवारी सरासरी ८५० रुपये भाव होता. या दरात उत्पादन खर्चही निघत नसल्याचे पाहून संतप्त शेतकर्‍यांनी लिलावाच्या ठिकाणी बाजार समिती आवारातच घोषणांबाजी सुरू केली. त्यानंतर घोळक्याने ते रस्त्यावर आले व मालेगाव चौफुलीवर शासन व बाजार समिती विरोधात घोषणा देत रस्त्यावर ठाण मांडले, सुमारे २० मिनिटे हा रास्ता रोको व घोषणाबाजी सुरू होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.अखेर शहर पोलिसांनी उत्पादक शेतकर्‍यांची समजूत काढली त्यानंतर रास्ता रोको मागे घेत शेतकर्‍यांनी आपला मोर्चा घोषणा देत बाजार समिती कार्यालयाकडे वळविला.

अखेर बाजार समिती कार्यालयात प्रशासन,संचालक मंडळ, व्यापारी व शेतकर्‍यांची संयुक्त बैठक झाली. भाव कोसळल्याने शेतकर्‍यांनी दिलेल्या निवेदनावर चर्चा होऊन ते शासनाकडे पाठविण्याचे आश्‍वासन देण्यात आले व कालच्या एवढ्या भावाची पातळी राखण्याचे आश्‍वासन संबंधितांनी या बैठकीत शेतकर्‍यांना दिले. यावेळी झालेल्या चर्चेच्या वेळी बाजार समिती प्रशासन व अधिकारी तसेच पोलीस अधिकारी, बाजार समिती संचालक किशोर लहाने, भागीनाथ यमंगर, भाऊसाहेब जाधव, मधुकर उगले, आनंदा मार्कंड, पी.के.गंधाक्षे उपस्थित होते. व्यापारी प्रतिनिधी इंदर चोपडा, शशिकांत सुराणा, संजय ललवाणी, राकेश ललवाणी, पप्पू रांका आदींची संयुक्त बैठक झाली.

आधीच नोटाबंदीचे संकट त्यात बँकांमध्ये रांगा लावून शेतकर्‍यांनी मजुरी व वाहतूक खर्चापुरती रोकड कशीबशी उभी केली व बाजार समितीत लाल कांदा लिलावासाठी आणला त्यात आज विक्रमी आठ हजार क्विंटल आवक झाली. त्यामुळे भावात विक्रमी घसरण होऊन भाव कमीतकमी ३०० ते जास्तीत जास्त ८५१ सरासरी ७०० रुपये निघाले कालपर्यंत सरासरी ८५० रुपये असलेले भाव एकदम १५० रुपयांनी घसरल्याने सातशे रुपयांवर आल्याने शेतकरी संतप्त झाले व त्याचा परिणाम आजच्या रास्ता रोकोमध्ये झाला.

आंदोलनानंतर पुन्हा बाजार समितीत लिलाव सुरू झाले व भाव गुरुवार इतका सरासरी ८५० रुपये क्विंटल निघाल्याने शेकार्‍यांनी लिलावात भाग घेतला त्यानंतर आवक झालेल्या सर्व ३९० ट्रॅक्टरमधील आठ हजार क्विंटल कांद्याचा दिवसअखेर लिलाव सरासरी ८५० रुपये भावाने झाला.

कांदा भावाचे गणित बिघडले

सुट्टीनंतर सोमवारी पुन्हा एकाचवेळी मोठ्या प्रमाणात माल बाजारात येणार असल्याने भाव सुधारण्याची शक्यता नसल्याचे निर्यातदार व्यापार्‍यांनी सांगितले. या परिस्थितीत पुन्हा एकदा कांदा शेतकर्‍यांना रडविणार आहे. दिवाळीच्या सुट्टीनंतर नोव्हेंबरच्या पहिल्या सप्ताहात मार्केट सुरू झाल्यानंतर भाव १७०० रुपयांपर्यंत होते. नोव्हेंबर अखेर ते १४०० रुपयांवर स्थरावले होते पण त्यानंतर विक्रमी आवक झाल्याने पुन्हा भावाचे गणित आता बिघडले.
कांद्याच्या दरात घसरण सुरुच

शेतकरी चिंताग्रस्त

लासलगाव: जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली असून, पंधरा दिवसात कमाल भाव क्विंटलमागे १६०० वरून ८६० रुपयांवर घसरला आहे. सरासरी भाव अवघा ६५० रुपये मिळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.

देशांतर्गत बाजारपेठेत महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थानच्या कांद्याची आवक वाढली आहे. मागणीपेक्षा आवक जास्त असल्याने भावात घसरण सुरू आहे. त्यात हिंदुस्थानपेक्षा चीन व पाकिस्तानचा कांदा स्वस्तात उपलब्ध होत असल्याने आखाती देशात आपली निर्यात घटली आहे. ख्रिसमस सणामुळे श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया, फिलिपाईन्समध्ये १० जानेवारीपर्यंत निर्यात बंद राहणार आहे. परिणामी, भाव आणखी घसरतील अशी शक्यता निर्यातदार व्यापारी मनोज जैन यांनी व्यक्त केली आहे.

आज लासलगाव बाजार समितीत २० हजार क्विंटल आवक होती. भाव कमाल ८६०, सरासरी ७०० व किमान ४०० रुपये क्विंटल होते. अवघ्या पंधरा दिवसात सरासरी भाव २५० रुपयांनी, किमान १०० व कमाल भाव ७५० रुपयांनी घसरले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या