कोरडवाहू क्षेत्र असणारे शेतकरी चिंतेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन ,धुळे

बहुसंख्य शेतकऱयांनी खरिप हंगामासाठी शेतीची मशागत केली, पण अजूनही पावसाची लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्र असणारे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पावसाचे चिन्ह नसल्याने शेतकऱयांकडून बियाणे आणि शेती साहित्य खरेदी होत नाही. शेतकऱयांनी पाठ फिरविल्यामुळे शेती साहित्य विक्री करणारेदेखील अडचणीत आले आहेत.

पाऊस नसल्याने साहित्य विक्रीकडे फिरवली पाठ

यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्हय़ातील शेतकऱयांनी शेतीची मशागत केली. काडी-कचरा गोळा करुन शेती क्षेत्र पेरणीयोग्य करण्यात आले आहे. बहुसंख्य शेतकरी 20 मेनंतर कपाशीची लागवड करतात, तर अनेक शेतकऱयांकडून ज्वारी, बाजरी, मका या बियाण्याच्या पेरणीची लगबग सुरू होते. पूर्वमोसमी पाऊस देखील होतो, पण यंदा पूर्व मोसमी पाऊस झालाच नाही. मोसमी पावसाची सुरुवात मृग नक्षत्रापासून होते. हे नक्षत्र दोन दिवसांवर आले तरी आकाशात पावसाची परिस्थिती नाही. शेतकरी आकाशाकडे डोळे लावून ढगांची वाट पाहत आहे. त्यातच हवामान खात्याने पाऊस लांबला असल्याचे जाहीर केले आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार 17 ते 18 जूनला पावसाचे आगमन होईल. खरोखर तसे झाले तर जनावरांचे पालनपोषण करायचे कसे? या प्रश्नाने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

मृग नक्षत्राच्या पूर्वी अनेक शेतकऱयांकडून बियाणे आणि शेती साहित्याची खरेदी होते, पण यंदा अजूनही पावसाची लक्षणे दिसत नसल्याने शेतकऱयांनी बाजाराकडे पाठ फिरवली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ आणि आग्रारोडवर शेती साहित्य घेऊन काही व्यावसायीक स्थिरावले आहेत. वखरणीसाठी लागणारी पास, विळा, कुदळ, पावडे, टिडकम, कुऱहाड हे साहित्य विक्रीसाठी आले आहे. बाजार समितीजवळ पथारी पसरवून काही महिला शेती साहित्य विक्री करीत आहेत. पाऊस नसल्याने शेतकरी आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही असे म्हणत शेती साहित्य विकणाऱया महिलांनी चिंता व्यक्त केली.