वडील आणि चुलत्याने अल्पवयीन मुलीला दिली फाशी, पुरावा नष्ट करण्यासाठी शेतात सरण रचून केले अंत्यसंस्कार  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालन्यातील पिरपिंपळगावात राहणारी अल्पवयीन मुलगी कुणाला काहीही न सांगता घरातून निघून गेली. काल मंगळवारी, 13 डिसेंबर रोजी की गावात परत येताच समाजात बदनामी होईल म्हणून पित्याने आणि चुलत्याने मुलीला गळफास देऊन तिचा खून केला. सूर्यकला उर्फ सुरेखा संतोष सरोदे (17) असे मयत मुलीचे नाव आहे.

खुनानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने पिता व चुलत्याने इतरांच्या मदतीने सरण रचून अंत्यसंस्कार केले. आज बुधवारी, 14 डिसेंबरला  सकाळी राख सावडण्याची तयारी  करीत असतानाच पोलीस आल्याने खुनाच्या घटनेला वाचा फुटली. पोलिसांनी पिता आणि चुलत्याला ताब्यात घेतले आहे.

याविषयी पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मयत मुलगी दोन दिवसांपूर्वी घरातून निघून गेली होती. तिची शोधाशोध सुरू असताना काल मंगळवारी ही मुलगी गावात परतली. मुलीचे पिता संतोष भाऊराव सरोदे आणि चुलता नामदेव भाऊराव सरोदे यांनी गावातील मुलासोबत लग्न लावून देण्याचा शब्द देत पिरपिंपळगाव – आन्वी रोडवरील देवीच्या मंदिरात तिचे गावातील मुलासोबत लग्न लावून देण्याची तयारी सुरू करण्यात आली.  दोन्हीकडील मोजकेच नातेवाईक हजर होते. लग्नाची तयारी सुरू असतानाच पित्याने मुलीच्या नावावर अर्धा एकर शेतजमीन करून देण्याची अट घातली. ही अट मुलाकडील मंडळींना मान्य नव्हती. त्यामुळे लग्न मोडून मुलीला घेऊन सर्व नातेवाईक शेतातील शेतवस्तीवर आले. मुलीच्या चुलत्याने आपली समाजात बदनामी झाल्याचे सांगून आत्महत्या  करण्याची धमकी दिली. त्यावर मुलीच्या वडिलांनी तू का आत्महत्या करतो, म्हणून त्यांनी मुलीला शेतातील झाडाजवळ नेऊन कपडे वाळत घालण्याच्या दोरीने मुलीला गळफास देऊन तिचा खून केला.

खून झाल्याचे कोणालाच कळू नये म्हणून त्यांनी शेतातच सरण रचून मुलीवर अंत्यसंस्कार केले. आज बुधवारी, 14 डिसेंबरला सकाळी राख सावडण्याचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी त्यांनी मुलीच्या शरीराची राख आणि हाडे एका पोत्यात भरून नदीत टाकण्यासाठी जात असतानाच दुसरीकडे या घटनेची कुणकुण लागताच पोलिसांनी शेतवस्तीवर धाव घेत त्यांचा डाव हाणून पाडला.

राखेचे पोते ताब्यात घेऊन पोलिसांनी वडील संतोष भाऊराव सरोदे आणि चुलता नामदेव भाऊराव सरोदे  या दोघांना ताब्यात घेतले. घटनास्थळावर उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू, पोलीस निरीक्षक रघुनात नाचन, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी पोहार, पोलीस उपनिरीक्षक गणेश झलवार, पोलिस कर्मचारी संजय गवई, अनिल चव्हाण, जितेंद्र तागवाले, रवी देशमुख, शिवाजी उबाळे, विजय साळवे आदींनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पंचनामा करून राख जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.