
बालपणीच्या प्रेमात अडसर ठरणाऱ्या वडिलांची मुलीने सुपारी देऊन हत्या केल्याची घटना झारखंडच्या जमशेदपूर येथे घडली आहे. अपर्णा सिंग असे या मुलीचे नाव असून तिने तिचे वडील कन्हैया सिंग यांचा काटा काढण्यासाठी आरोपीला सुपारीत हिऱ्याची अंगठी दिली होती. मृत कन्हैया सिंग हे माजी आमदार अरविंद सिंह यांचे मेहुणे आहेत. या हत्येप्रकरणी पोलिसांनी अपर्णा सिंग, तिचा प्रियकर राजवीर सिंग आणि अल्पवयीन निखिल गुप्ता या आरोपींना अटक केली आहे. आरोपी निखिल गुप्ता हा सरायकेला-खरसावन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष छोटेराई किस्कू यांचा मुलगा आहे. इतर फरार असलेल्या दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
आदित्यपूर ऑटो क्लस्टरमध्ये शुक्रवारी झालेल्या हत्याकांडाचा खुलासा करताना सरायकेला-खरसावन जिल्ह्याचे एसपी आनंद प्रकाश म्हणाले की, राजवीर सिंग नावाच्या मुलाचे मृताची मुलगी अपर्णा हिच्याशी पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यांच्या प्रेमाला कन्हैया सिंग यांचा विरोध होता. कन्हैया सिंग अपर्णाला शिवीगाळ करत असे आणि राजवीर सिंग आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमक्याही दिल्या जात होत्या. मात्र तरीही अपर्णाने राजवीरसोबत प्रेमसंबंध सुरू ठेवले. यानंतर एके दिवशी कन्हैयाने राजवीरला आपल्या कार्यालयात बोलावून त्याच्यावर पिस्तुल रोखून धमकी दिली.
कन्हैया सिंगच्या भीतीमुळे राजवीर सिंगच्या वडिलांनी मांझी टोला येथील घर कमी किमतीत विकले आणि आंबा येथे भाड्याच्या घरात ते राहू लागले. राजवीरनेही भीतीपोटी मुलीशी बोलणे सोडून दिले. त्यानंतर अपर्णाने राजवीरला बोलण्यास विनंती केली. तरीही तो बोलला नाही. त्यानंतर अपर्णाने मुलाला घाबरवण्यासाठी उंदराचे औषध खाल्ल्याचा व्हिडिओ पाठवला. हे पाहून राजवीर घाबरला आणि त्याने वडिलांना सांगितले. या घटनेनंतर राजवीर पुन्हा अपर्णाशी बोलू लागला. याची माहिती मिळताच कन्हैया सिंगने पुन्हा एकदा राजवीरला धमकी दिली.
मात्र सततच्या धमक्यांना कंटाळून राजवीर आणि अपर्णाने कन्हैया सिंग यांचा काटा काढण्यासाठी आरोपीला सुपारी दिली. आरोपीला सुपारीत एक दारूची बाटली, पाच हजार रोख आणि हिऱ्यांची अंगठी देण्यात आली, व आरोपी निखिल गुप्ता याने त्याबदल्यात कन्हैया सिंग यांची हत्या केली.
























































