
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आज लालबाग, परळ, चेंबूर, मालाड आदी भागांमध्ये धडक कारवाई केली. तब्बल 10 हॉटेल्स आणि दुकानांच्या तपासणीत अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे आढळल्याने एफडीएने त्यांचे परवाने निलंबित केले.
लालबाग, परळ येथील स्वाद स्नॅक्स कॉर्नर या दुकानात कमालीची अस्वच्छता आढळल्याने दुकानाचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला. बॅलार्ड पियर येथील स्वीगी इन्स्टामार्ट डार्क स्टोअरमध्ये तांदळाच्या पिशव्या उंदरांनी कुरतडलेल्या आढळल्या आणि त्या तांदळामध्ये उंदराच्या लेंडय़ा होत्या. स्टोअरमधील फ्रीज उघडला तेव्हा अधिकाऱयांना धक्काच बसला. फ्रीजमध्ये झुरळे मरून पडली होती. मालाड येथील सद्गुरू स्वीट्स, मोहम्मद अली रोडवरील सुलेमान उस्मान मिठाईवाला या दुकानांमध्ये मिठाईवर माशा मोठय़ा प्रमाणात बसल्याचे दिसून आले. कांदिवली पश्चिम येथील ऍक्युलॉजिक्स सप्लाय चेन, चेंबूर येथील नाईस एंटरप्रायझेस, घाटकोपर येथील गो ग्रीन फूड हॉस्पिटॅलिटी, अंधेरी पश्चिम येथील लखनवी कबाब आणि जायका मुरादाबादी हॉटेल या आस्थापनांमध्येही अन्न सुरक्षा नियमांचे व स्वच्छतेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्याने परवाना निलंबनाची कारवाई केली गेली.

























































