
ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या बिग बजेट चित्रपटांशी टक्कर टाळण्यासाठी अनेक निर्मात्यांनी सप्टेंबर महिन्यात आपले चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, सप्टेंबरमध्ये तब्बल 15 हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात ‘मिर्झापूर ः द मूव्ही’, ‘हैवान’, ‘दायरा’, ‘वाइब’ आणि ‘द वन’ या चित्रपटांचा समावेश आहे. त्यामुळे चित्रपटप्रेमींसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे.
ऑक्टोबरमध्ये ‘दृश्यम-3’, ‘उडता तीर’, ‘जेलर-2’ आणि ‘प्रहार ः द उज्ज्वल निकम स्टोरी’ असे हिंदी तसेच दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील काही मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे या बड्या चित्रपटांच्या आसपास रिलीज केल्यास स्क्रीन आणि शोज मिळवण्यासाठी स्पर्धा वाढण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन काही निर्मात्यांनी सप्टेंबरचा मुहूर्त निवडला आहे.
चित्रपटाच्या व्यवसायासाठी रिलीजची तारीख अत्यंत महत्त्वाची ठरते. एकाच आठवडयात दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाल्यास त्यांच्यात प्रेक्षक, स्क्रीन आणि शोज यासाठी थेट स्पर्धा निर्माण होते. विशेषतः पहिल्या वीकेंडला मिळणारा प्रतिसाद चित्रपटाच्या पुढील व्यवसायासाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे लोकप्रिय कलाकार किंवा मोठया फ्रँचायझीचे चित्रपट असलेल्या आठवडयांपासून अंतर ठेवून आपला चित्रपट प्रदर्शित करण्याकडे निर्मात्यांचा कल असतो.





























































