हनुमान चालीसा पठण प्रकरण – नवनीत राणांची अटक वैधच, हायकोर्टात पोलिसांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
court

हनुमान चालीसा पठणप्रकरणी नवनीत राणा व रवी राणा यांना केलेली अटक वैधच होती, असा दावा पोलिसांनी हायकोर्टात केला. हा सर्व तपशील प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. पुढील सुनावणी २३ सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली.

माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे राणा दाम्पत्याने जाहीर केले होते. त्यावेळी खार पोलिसांनी त्यांना अटक केली. ही कारवाई होत असताना राणा यांनी पोलिसांशी हुज्जत घालत धक्काबुक्की केली. याचा स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला. या गुन्ह्यातून दोषमुक्तीसाठी राणा यांनी याचिका दाखल केली आहे. न्या. शिवकुमार डिगे यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. “पोलिसांनी आम्हाला सायंकाळी ५.०३ वाजता अटक केली, तर गुन्हा ५.२३ वाजता नोंदवण्यात आला. गुन्हा नोंदवण्याआधी आम्हाला अटक केली जाऊ शकत नाही, त्यामुळे ही कारवाईच अवैध ठरते,” असा युक्तिवाद राणा यांच्या बाजूने करण्यात आला. पोलिसांनी मात्र हा युक्तिवाद खोडून काढला.