खतसाठ्याची माहिती आता एका क्लिकवर; ‘कृषी’ची ‘ब्लॉगस्पॉट’ ऑनलाइन प्रणाली कार्यान्वित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतकऱ्यांना त्यांच्या परिसरातील कृषी सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या खतांची अचूक माहिती सहज मिळावी आणि खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता यावी, यासाठी कृषी विभागाने ‘ब्लॉगस्पॉट’ ही ऑनलाइन प्रणाली सुरू केली आहे. या सुविधेमुळे शेतकरी क्यूआर कोड स्कॅन करून किंवा उपलब्ध लिंकच्या माध्यमातून जिल्हा, तालुका आणि खताचा प्रकार निवडून संबंधित कृषी सेवा केंद्रांतील खतसाठय़ाची माहिती पाहू शकणार आहेत.

या प्रणालीमध्ये कृषी सेवा केंद्राचे नाव, दुकानदाराचा मोबाईल क्रमांक तसेच उपलब्ध खतांचा साठा याची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना आधार पडताळणी (थम्ब) केल्यानंतरच खरेदीची नोंद होणार असल्याने माहिती अधिक विश्वासार्ह राहणार आहे. जिह्यात युरियासह विविध खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. मागील वर्षी जून महिन्यात सुमारे 13 हजार 676 मेट्रिक टन युरियाचा साठा उपलब्ध होता, तर यंदा तो वाढून 14 हजार 265 मेट्रिक टनापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे खतांचा तुटवडा नसून, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता नियोजनपूर्वक खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले की, खत वितरणातील गैरसमज दूर करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना तत्काळ माहिती मिळावी, यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. कोणतीही अडचण आल्यास संबंधित कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.