
सामना ऑनलाईन । नेवरगाव
गंगापूर तालुक्यात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या. रोहिणी नक्षत्रापाठोपाठ अर्धे मृग नक्षत्र झाले तरी पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे.
गंगापूर तालुक्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून दुष्काळाच्या सतत झळा सहन करत असलेल्या शेतकऱ्याला यंदा तरी पुरेसा पाऊस होईल अशी अपेक्षा होती. त्याचबरोबर हवामान खात्याने वर्तविलेल्या मान्सूनचा अंदाज खरा ठरेल व पुरेसा पाऊस होईल या अपेक्षेने शेतकऱ्याने खरिपाच्या पेरणीसाठी मशागती करून व उसनवारी करून बी-बियाण्यांचा भरणा केला. परंतु हा सर्व खर्च होऊनही रोहिणी नक्षत्रापाठोपाठ मृगनक्षत्रातही पावसाने दडी मारल्याने यावर्षीही आर्थिक गणित बिघडते की काय, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.
मागील वर्षी अल्प पावसाने व बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले. याहीवर्षी बोंड अळीची भीती आहेच. कपाशीच्या लागवडीसाठी शेतीच्या सर्व मशागती केल्या आहेत. गंगापूर तालुक्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस वगळता कोठेही पुरेसा पाऊस झालेला नाही. मृग नक्षत्राचा पाऊस खरीपाच्या पेरणीसाठी अनुकूल असतो. या नक्षत्रात जर खरीपाची पेरणी झाली नाही तर पिकाच्या उत्पादनात मोठी घट होते. अर्धे मृग नक्षत्र उलटूनही तालुक्यात कोठेही अजून पाऊस झालेलाच नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.






























































