Mumbai Fire News – मुलुंडमध्ये PAP प्रकल्पाला भीषण आग; स्फोटाचे आवाज, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुलुंड पूर्व येथील व्ही. बी. फडके मार्गावर असलेल्या एका निर्माणाधीन इमारतीतील कामगारांच्या तात्पुरत्या शेडला गुरुवारी दुपारी अचानक भीषण आग लागली. ही घटना केळकर कॉलेज आणि पूर्वरंग सोसायटीच्या अगदी लगत असलेल्या नीलम रियल्टर्सच्या कन्स्ट्रक्शन साईटवर घडल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. आग लागल्याचे समजताच परिसरात एकच खळबळ उडाली असून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे.

आग लागल्याची माहिती दुपारी 1.54 वाजता मुंबई अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असून याग आगीचे लोट आणि धुराचे साम्राज्य परिसरात पसरल्याचे दिसत आहे.

स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, आग लागण्यापूर्वी जोरदार स्फोटाचा आवाज झाला होता. सुदैवाने या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही. आगीचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नसून पुढील तपास सुरू आहे.