मासेबाव येथे दुचाकी अपघातात एक जण ठार, तर दुसरा गंभीर जखमी

निवळी ते गणपतीपुळे मार्गावर मासेबाव येथे दुचाकीचा भीषण अपघात होऊन त्यात एक जण ठार, तर दुसरा एक गंभीर जखमी झाला. राजू फक्रुद्दीन शेख असे या अपघातातील मृताचे नाव आहे. हे दोघे दुचाकीस्वार मासेबाव वरून निवळीकडे चालले होते.

थोड्या अंतरावर पाण्याच्या टाकीजवळ दुचाकी रस्त्याच्या उजवीकडील चरीत पडली. त्यात स्वप्नील सदाशिव वांगवडेकर (41, रा. बावनदी), राजू फक्रुद्दीन शेख (38, रा. कोल्हापूर) हे दोघे गंभीर जखमी झाले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची हातखंबा येथील रुग्णवाहिका पोलिसांच्या मदतीने तातडीने मासेबाव येथे पोहोचली. दोघा जखमींना रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यातील राजू शेख यांना मृत घोषित करण्यात आले. दुसऱ्या जखमींवर उपचार सुरू आहेत.