पावसाळ्यात व्यायामाला ब्रेक? अहं…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

– डॉ. अस्मिता सावे. रिजॉंइस वेलनेस

आपल्या पैकी वजन कमी करायचे आहे आणि वजन वाढवायचे आहे अशी इच्छा मनामध्ये ठेवणारे खूप जण असतील. ध्येयाकडे जाण्यासाठी ते नियमितपणे व्यायामही करत असतील पण आता पावसाळा सुरु झाला आहे. जे लोक व्यायाम करत नाहीत त्यांच्यासाठी तर एक कारणाच मिळालेले आहे. “पावसामुळे व्यायाम बंद पडला आहे” असे सांगत अनेक लोक डॉक्टरांकडे जातात.

व्यायाम हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. वजन कमी करणे किंवा वाढवणे हा व्यायामाचा हेतू नाही. व्यायामामुळे शरीर आणि मनाचे स्वस्थ दोन्हीला मदत होते. व्यायामामुळे शरीरात जी रसायने आणि होर्मोनस निर्माण होतात त्यामुळे अनेक अवयवांना सुरळीत काम करण्यात मदत होते. तसेच मनाचा शीण जाण्यास आणि नवचैतन्य येण्यास मदत होते. त्यामुळे व्यायाम हा चांगले निरोगी आयुष्य जगण्यासाठी गरजेचा आहे. पावसाळ्यात बाहेर मोकळ्यावर व्यायाम करणे कठीण होते. कधी चिखल, कधी तुंबलेले पाणी तर कधी जोरात आलेली पावसाची सर. पण अशा वेळी आपण घरात किंवा जिममध्ये व्यायाम करू शकतो.

१) घरात जर व्यायाम करायचा असेल तर सर्वात महत्वाचे म्हणजे रोजची व्यायामाची वेळ कायम ठेवा. अनेकदा घरीच करायचं तर करू नंतर असे म्हणून व्यायाम राहून जातो. त्याऐवजी रोज ज्या वेळ आणि जितका वेळ तुम्ही व्यायामासाठी बाहेर जाता नेमका तेव्हाच घरात व्यायाम करा.

२) व्यायामाची सुरवात सध्या सोप्या वॉर्म अप व्यायामाने, स्ट्रेचिंग व्यायाम प्रकाराने करा. यामुळे सर्व सांधे आणि स्नायू मोकळे होतात. यामुळे नंतर व्यायाम करताना स्नायूंचे दुखणे उद्भवत नाही.

३) घरातल्या घरात व्यायाम करायचा म्हंटले की जागच्या जागी व्यायाम करणे आले. अश्यावेळी जागच्याजागी जॉगिंग, दोरीच्या उड्या, उठाबश्या, उभे राहून पायाचे अंगठे पकडणे असे व्यायामाचे प्रकार करावेत.

४) सूर्यनमस्कार घालणे हा अत्यंत उपयुक्त व्यायाम आहे. सुर्यानमास्कारामुळे शरीरातील सर्व अवयांना, सांध्यांना आणि स्नायुंना व्यायाम मिळतो. सूर्यनमस्कार घालताना आधी कृती नीट समजून घेऊन घालावेत. तर त्याचा सर्वाधिक उपयोग होतो.

५) घरातील किंवा इमारतीतील जिने चढ उतार करणे हा देखील उत्तम व्यायाम आहे. पण व्यायाम म्हणून ठरलेला वेळ हा व्यायाम सतत करायला हवा. भाजी आणायला बाहेर पडताना एकदा, कामाला बाहेर जाताना एकदा, मुलांना शाळेला सोडायला जाताना एकदा, घरी येताना एकदा असे जिने चढ उतार करण्याचा शरीराला व्यायाम म्हणून उपयोग होते नाही. सलग १५ ते २० मिनटे जिने चढ उतार करणे म्हणजे व्यायाम झाला असे म्हणता येईल. जिने चढ उतार करताना गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने व्यायाम होतो त्यामुळे याचा शरीराला जास्त उपयोग होतो.

६) घरातल्याघरात योग, प्राणायम करणे हा सुद्धा उत्तम पर्याय आहे. योगा आणि प्राणायामामुळे मन शांत होण्यासाठी सुद्धा छान मदत होते. शरीराचा रक्तप्रवाह उत्तम होतो. त्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यासदेखील मदत होते.

७) तुम्हाला जर नाच करायला आवडत असेल तर खुशाल तासभर मनसोक्त नाच करा. नाच करण्याने शरीराला तर उत्तम व्यायाम मिळतोच पण मन देखील प्रफुल्लीत होते. आसपासकोणी आहे की नाही याचा विचार सोडून नृत्यात रममाण होऊन जा.

८) घरातील बरीच कामसुद्धा आपल्याला छान व्यायाम मिळवून देऊ शकतात. खाली बसून केर काढणे, खाली बसून फडक्याने फारशी पुसणे, खाली बसून भांडी घासणे, घरातील समान पुसणे, कपाट खण आवरणे, माळ्यावारचे सामान आवरणे किंवा स्वच्छ करणे अशी अनेक काम व्यायाम म्हणून उपयोगाला येऊ शकतात.

९) तुमच्या घरात किंवा आजूबाजूला लहान मुलं असतील तर त्यांच्याबरोबर घरातल्या घरात पकडापकडी, लपाछपी खेळणे किंवा चेंडूने खेळणे हा सुद्धा आनंद देणारा उत्तम व्यायाम असू शकतो. लहान मुले म्हणजे ऊर्जेची खाण असतात. त्यामुळे तुमचा अख्खा दिवस छान जाईल.

१०) तुम्हाला घरी एकटे व्यायाम करायला कंटाळा येत असल्यास हल्ली इंटरनेट वर अनेक अएरोबिक व्यायामाचे छान व्हिडीओ उपलब्ध असतात. तुम्ही तुमच्या डॉक्टर किंवा आहारतज्ञाना विचारून तुमच्या शरीरासाठी योग्य तो व्हिडीओ शोधून घेऊन दररोज वापरू शकता. हे व्हिडीओ फार उत्तम असतात. यात स्क्रीन वर दिसणारी माणसे आपल्याला व्यायाम करून दाखवत असतात. त्याच बरोबर ते हा व्यायाम कसा आणि का करावा हे सांगत सुद्धा असतात. आणि तुमच्या बरोबरीने ते तितका वेळ ते विविध व्यायाम करत राहतात.