
हैदराबाद शहरात 28 मे रोजी मर्सिडीज गाडीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. बलात्कार प्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींपैकी एक जण तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचा पक्ष असलेल्या तेलंगणा राष्ट्र समितीच्या स्थानिक नेत्याचा मुलगा आहे. आणि इतर सर्व आरोपी देखील हाय प्रोफाइल कुटुंबातील असल्याची माहिती मिळत आहे.
उमर खान असे या स्थानिक नेत्याच्या मुलाचे नाव आहे. उमरचे वडील तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाचे नेते आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सुरू असलेल्या तपासात बलात्काराच्या घटनेत उमरचा सहभाग आढळून आला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
या सामूहिक बलात्कार प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या 5 आरोपींपैकी 3 जण अल्पवयीन आहेत तर 2 जण 18 वर्षांचे आहेत. शुक्रवारी उमरला अटक करण्याच्या आधी पोलिसांनी साहुद्दीन मलिक नावाच्या आरोपीला अटक केली होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार सीसीटीव्ही फुटेज आणि पीडितेच्या वक्तव्याच्या आधारे पाचही आरोपींची ओळख पटली आहे. सुरुवातीला पीडितेला केवळ एका आरोपीचे नाव सांगता आले. यानंतर तपासादरम्यान इतर आरोपींची ओळख देखील पटली. सर्व आरोपींना पकडण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

























































