बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेय यांची राजकारणात एन्ट्री, सीएमच्या उपस्थितीत जदयूमध्ये प्रवेश

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेय यांची अखेर राजकारणात एन्ट्री झाली आहे. पांडेय यांनी रविवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत जदयूमध्ये प्रवेश केला. नितीश कुमार यांच्या निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात त्यांना जदयूचे सदस्यत्व देण्यात आले.

गुप्तेश्वर पांडेय यांनी गेल्यास आठवड्यात स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली होती. तेव्हापासून आगामी बिहार निवडणूक पाहता ते राजकारणात येणार अशी चर्चा रंगली होती. अखेर शनिवारी त्यांनी जडयू कार्यालय गाठले. मात्र पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी आपले पत्ते न खोलता ही शिष्टाचार भेट असल्याचे सांगितले. त्यामुळे ते भाजप की जदयू यापैकी कोणत्या पक्षात प्रवेश करतील यावर उहापोह सुरू झाला. मात्र रविवारी त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी जदयूचा हाथ हाती घेतला.

याआधी 22 सप्टेंबरला त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असणाऱ्या गुप्तेश्वर पांडेय यांचा सेवाकाळ पाच महिन्यांनी संपणार होता. 1 जानेवारी, व019 ला पोलीस महासंचालक पद ग्रहण करणाऱ्या पांडेय यांचा सेवाकाळ 28 फेब्रुवारी, 2021 ला संपणार होता. मात्र बिहार निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. आता जदयू त्यांना कोणत्या मतदार संघातून उमेदवारी देणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

बिहार निवडणुकीची तारीख जाहीर
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ही निवडणूक तीन टप्प्यात होणार आहे. 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर, 7 नोव्हेंबरला मतदान होणार असून 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या