
सामना प्रतिनिधी । नागपूर
19 नोव्हेंबर 2018 रोजी रेशीमबाग मैदानावर अवैध असलेल्या शस्त्रांचे पूजन करण्यात आले. तसेच असंख्य काठ्यांसह जमाव जमवून कायद्याचे उल्लंघन करण्यात आले. याप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी राज्याचे माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक सुरेश आबाजी खोपडे यांनी आज बुधवारी टिळक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केली.
1 डिसेंबर 2018 रोजी सुरेश खोपडे यांनी कारवाई करण्यासंदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज सादर केला होती. सीआरपीसी कलम 154 नुसार केलेली तक्रार दखलपात्र आहे. आयपीसीच्या कलम 153 ‘अ’ नुसार काठ्यांसह जमाव जमविणे, तसेच प्राणघातक शस्त्र बाळगणे हा गुन्हा आहे. त्यामुळे मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस आणि गडकरी यांनी कायद्याचे उल्लंघन केले असल्याचा आरोप खोपडे यांनी यावेळी केला.
राज्यघटनेनुसार, दखलपात्र गुन्ह्याची तक्रार पोलीस अधिकाºयाने प्रथम दाखल करावी तसेच चौकशी अंती गुन्हा दाखल करावा, असा नियम असताना दिलेली तक्रार पोलीस स्वीकारत नाही. दिलेल्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. पोलीस आयुक्त भेटीस टाळाटाळ करतात. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करण्याचा प्रकार पोलीस करीत आहेत. त्यामुळे न्याय मिळणे अशक्य दिसते. त्यामुळे लोकशाही मार्गाने लढा उभारून रस्त्यावर उतरून पोलीस आणि मोहन भागवत यांच्याविरुद्ध आवाज उठवावा लागेल, असा इशारा यावेळी खोपडे यांनी दिला.
आरएसएसकडे असलेली शस्त्रे कुणाच्या मालकीची आहेत किंवा शस्त्र बाळगण्याचा उद्देश काय? असा प्रश्न उपस्थित करून खोपडे यांनी यावेळी पोलिसांनी याची माहिती द्यावी, अन्यथा पोलीस प्रशासन आणि मोहन भागवत, फडणवीस, गडकरी यांच्याविरुद्ध न्यायालयात धाव घेऊन न्याय मागण्यासाठी मी सक्षम असल्याचेही सुरेश खोपडे यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केले. यावेळी त्यांचे सहकारी नागेश चौधरी आणि सुरेश बोरकर उपस्थित होते.

























































