
जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. जम्मू-कश्मीर क्रिकेट असोसिएशनमधील आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीने त्यांना 31 मे रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. याच प्रकरणात 2019 मध्येही त्यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. त्यांच्याविरोधात ईडीने एकापाठोपाठ एक समन्सचा सपाटा लावला आहे. त्यावर संतप्त प्रतिक्रिया नोंदवत नॅशनल कॉन्फरन्सने भाजपवर सडकून टीका केली आहे. देशातील सर्व विरोधी पक्षांसाठी हे सामान्य झाले आहे. जेव्हा कोणत्याही राज्यात निवडणुकांच्या घोषणेची शक्यता असते त्यावेळी तपास यंत्रणा सर्वात आधी भाजपसाठी रस्ता मोकळा करण्यास पुढे येतात, असे ट्विट नॅशनल कॉन्फरन्सने शुक्रवारी केले.

























































