अमेरिकन डॉलर स्वस्तात देण्याच्या बहाण्याने फसवणूक , चार जणांची टोळी जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आमच्याकडे अमेरिकन डॉलर आहेत. ते आम्ही स्वस्तात विकत आहोत, अशी लालच दाखवून एका वृद्धाला दोन लाख 70 हजार रुपयांना चुना लावणाऱया एका टोळीला कुर्ला पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपींनी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई परिसरात अशा प्रकारे गुन्हे केले असून बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नवी मुंबईच्या नेरूळ येथे राहणारे प्रदीप कुमार कौंडल (62) यांची भामटय़ांनी फसवणूक केली होती. आरोपींनी कौंडल यांना अमेरिकन डॉलर स्वस्तात देऊ असे सांगितले. स्वस्तात अमेरिकन डॉलर मिळत असल्याने कौंडल खुशीत होते. आरोपींनी कौंडल यांना कुर्ला पश्चिमेकडील बस डेपो येथे बोलावले. तेथे कौंडल यांच्याकडून दोन लाख 70 हजार रुपये घेऊन मोबदल्यात नोटांचे बंडल कौंडल यांना पिशवीत टाकून दिले. दरम्यान, कौंडल यांनी पिशवीतल्या नोटांचे बंडल तपासले असता ते कागदाचे बंडल निघाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कौंडल यांनी कुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक रवींद्र होवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गुह्याचा तपास सुरू केला. घटनास्थळावरील तसेच नवी मुंबईतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याबरोबर तांत्रिक बाबींचा अभ्यास केला असता आरोपी शीळ फाटा, डोंबिवली परिसरात असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने शिताफीने सापळा रचून युसूफ सैमुद्दीन शेख (33), मोहम्मद चांदमिया शेख, रफिक हलीम शेख राठी, मोईन अख्तर शेख राठी या चौघा भामटय़ांना डोंबिवलीच्या भोपरगाव येथून पकडण्यात आले.