वीज बिलाच्या नावाखाली फसवणूक सुरूच 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वीज बिलाच्या नावाखाली ठगांकडून नागरिकांच्या फसवुकीचे प्रकार सुरूच आहेत. फसवणूक प्रकरणी चारकोप आणि समता नगर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत.

चारकोप येथे ज्येष्ठ नागरिक राहतात. तीन दिवसांपूर्वी त्यांना मोबाईलवर एक मेसेज आला. नोव्हेंबर महिन्याचे बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित करू, त्या मेसेजमध्ये एक नंबर होता. त्या नंबरवर वृद्धाने पह्न केला. तेव्हा तो पह्न ठगाने उचलला. त्याने आपण अदानी इलेक्ट्रीक सिटीमधून बोलत असल्याचे सांगून तुमचे बिल मिळाले नाही का अशी विचारणा केली. तेव्हा वृद्धाने आपण बिल भरल्याचे ठगाला सांगितले. बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडित करून दहा हजार रुपये दंड भरावा लागेल अशा त्याने भूलथापा मारल्या. त्यानंतर ठगाने वृद्धाकडून एटीएमचा नंबर विचारला. ठगाने ओटीपी घेतल्यानंतर वृद्धाच्या खात्यातून 3 लाख 27 हजार रुपये काढले गेले. फसवणूक झाल्या प्रकरणी वृद्धाने चारकोप पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तर दुसरी घटना कांदिवली पूर्व परिसरात घडली. वृद्ध महिला या समता नगर परिसरात राहतात. गेल्या आठवडय़ात त्याना मोबाईलवर मेसेज आला. विजेचे बिल भरले नाही तर आज रात्रीपासून वीज पुरवठा खंडित केला जाईल, असे महिलेला सांगण्यात आले. त्या मेसेजमधील नंबरवर महिलेने पह्न केला. तेव्हा ठगाने लाईट बिल यंत्रणा अजून अपडेट केली नाही अशा भूलथापा मारल्या. ठगाने महिलेला बोलण्यात गुंतवून त्याच्या एटीएमची माहिती घेतली. त्याच दरम्यान महिलेच्या मोबाईलवर एक ओटीपी आला. ओटीपी आल्यावर ठगाने वीज बिल अपडेट होईपर्यंत ओटीपी येतच राहणार असल्याच्या भूलथापा मारल्या. महिलेने ओटीपी शेअर करताच त्याच्या खात्यातून 4 लाख 73 हजार रुपये काढले गेले. पैसे काढल्याचे लक्षात येताच महिलेने समता नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला.